Malanggad Water Crisis Pudhari
ठाणे

Malanggad Water Crisis: श्री मलंगगड परिसरात भीषण पाणीटंचाई

अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून नागरिकांची टँकरवरच भिस्त राहिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी: कल्याण पूर्व मतदारसंघातील श्री मलंगगड परिसराला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, विहिरी, कूपनलिका आणि बोअरवेल यांनी तळ गाठल्याने संपूर्ण परिसरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून नागरिकांची टँकरवरच भिस्त राहिली आहे.

कल्याण लोकसभेतील ढोके, खरड, श्री मलंगगड, कुंभार्ली तसेच परिसरातील अन्य गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. दैनंदिन वापरासाठी टँकरचे पाणी उपलब्ध होत असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागत आहे. अनेक ठिकाणी महिलांना सकाळपासून पाण्याच्या भांड्यांसह रांगा लावाव्या लागत असून काही ठिकाणी पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी शहराच्या परिसरात जावं लागत आहे.

उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळा तोंडावर असतानाही पाणी टंचाई कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणेही शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य, शेती आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे.

विशेष म्हणजे बदलापूर येथील बारवी धरणाचे पाणी नेवाळी नाका येथून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात वितरित केले जाते. मात्र ज्या मलंगगड भागाच्या वेशीवरून ही जलवाहिनी जाते, त्याच भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

एका बाजूला जिल्ह्याची तहान भागविणारे पाणी या भागातून जात असताना दुसऱ्या बाजूला स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे श्री मलंगगड परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकप्रतिनिधी गेले कुठे ?

प्रत्येक निवडणुकीत श्री मलंगगड पट्ट्यातील पाणी प्रश्न चर्चेला येत असतो. सातत्याने उमेदवार आम्ही पाणी टंचाई मुक्त गाव करू अशी आश्वासन देऊन जात आहेत.मात्र महिला वर्गाच्या डोक्यावरील पाण्याचे हांडे उतरविण्याचे काम आद्यपही कोणत्याही लोकप्रतिनिधीने केलेलं नाही. त्यामुळे आता जे लोकप्रतिनिधी गावात दिसतील त्यांना महिलांच्या रोषाला समोर जावं लागणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT