

ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आता चांगलेच रंग भरू लागले असून महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे. भाजपचे माजी राज्य मंत्री कपिल पाटील यांनी शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने परिवर्तन पॅनल जाहीर झाल्याचा दावा केला होता.
मात्र परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, भाजप आमदार किसन काथोरे, एनसीपीचे माजी आमदार सुनील भुसारा आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची युती झाली असून ते सोमवारी उमेदवार जाहीर करणार आहेत.
ठाणे जिल्हा बँकेची २७ जून रोजी निवडणूक होणार असून २१ पैकी १० उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक परिवर्तन पॅनल म्हणून शिवसेना, भाजप आणि एनसीपी मिळून महायुती लढणार असल्याचा दावा परिवर्तन पॅनलचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी जाहीर केले आहे.
यावेळी शिवसेनेतर्फे बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील उपस्थित होते. मात्र शिवसेनेचा कोणी ही नेता उपस्थित नव्हता. त्यावेळी महायुतीचे उमेदवार आणि पॅनल हे शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणा यांच्या सहमतीने जाहीर केल्याचा दावा केला होता. त्यावेळी भाजपसह शिवसेनेचे नेते नाराज असून ते सर्व पक्षीय पॅनल उतरवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते.
अखेर परिवर्तन पॅनल यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर, भाजप आमदार किसन कथोरे, शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक आणि एनसीपी शरद पवार पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा, भाजपचे बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी युती करुन स्वतंत्र पॅनल तयार केला आहे. त्याची घोषणा उद्या होईल. त्यानंतर कोण उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील हे निश्चित होईल.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून दहा बिनविरोध झालेल्या संचालकांमध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, जयेश पाटील, माजी आमदार अमित घोडा, अरुण पाटील, माजी आमदार सुनील भुसारा, सौरभ पवार, दसु रड्या, आकाश पाटील, बँकेच्या माजी अध्यक्षांचे चिरंजीव मनीष पाटील आणि भाग्यश्री भोईर यांचा समावेश आहे.
बविआचे हार्दिक राऊत भाजप पुरस्कृत पॅनलमधून उमेदवार
वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक राहिलेले हार्दिक राऊत आता जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी नशीब आजमावत आहे. माजी नगरसेवक असलेल्या हार्दिक राऊत यांचा यावेळी महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला. आता मात्र ते भाजपच्याच पुरस्कृत पॅनल मधूनच संचालक पदाची निवडणूक लढत आहे.
जिल्हा बँकेचा इतर मागासवर्गीय या मतदार संघासह खरेदी-विक्री प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्थांतर्फे, औद्योगिक संस्था, मजूर सहकारी संस्था तर्फे, इतर बिगर शेती संस्था तर्फे या मतदारसंघात देखील ते नशीब आजमावत आहेत. इतर मागासवर्गीय या मतदारसंघांमध्ये एकूण 4,021 मतदार आहेत. तर दुसऱ्या मतदारसंघात 2835 मतदार आहेत.
त्यामुळे वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांच्यासोबतच पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील भाजप नेत्यांचा आशीर्वाद सुद्धा हार्दिक राऊत यांना या निवडणुकीत जिंकण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी भाजप पुरस्कृत पॅनल मधून संचालक पदासाठी निवडणुकीत उडी घेतली आहे. एकंदरीतच ही निवडणूक जिल्हा बँकेची असली तरी, वसई विरार मध्ये मात्र हार्दिक राऊत यांच्या या उमेदवारीवरून विविध चर्चांना ऊत आला आहे.
सहकाराची निवडणूक सांगत राजकारणाची खिचडी
ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीत राजकारणाची खिचडी झाल्याचे पहावयास मिळत आहे. कारण की या निवडणुकीच्या माघारीचा दिनांक हा 17 जून असताना त्या अगोदरच 21 पैकी दहा संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत. यातील आठ संचालक आमचे असल्याचा दावा सहकार पॅनल कडून करण्यात आला आहे.
मात्र या बिनविरोध निवडीतील संचालकांना पाहिल्यास यातील काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष cpm आणि शिवसेना शिंदे गटाचे देखील दिसून येतात तर दुसरीकडे यातीलच काही संचालकावर परिवर्तन पॅनल कडून देखील हे संचालक आमचेच असा दावा केला जाऊ शकतो. परिवर्तन पॅनलचे प्रमुख म्हणून माजी खासदार कपिल पाटील यांच्याकडे पाहिले जाते तर सहकार पॅनलचे प्रमुख म्हणून माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते.
यामध्ये अजून एक गंमत म्हणजे परिवर्तन पॅनलच्या प्रचार साहित्यावर भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार असा उल्लेख आहे तर सहकार पॅनलच्या प्रचार पत्रिकेवर शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो देखील पहावयास मिळत आहे. यामुळे सहकार क्षेत्रातील ही निवडणूक सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे चालल्याचे दिसून येत आहे. तर जव्हार आणि पालघर तालुक्यातून निवडून द्यावयाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत तर हे दोन पॅनल सोडून पुन्हा काही अपक्ष उमेदवार या निवडणुकीत उभे टाकले आहेत .