Thane DCC Bank  pudhari photo
ठाणे

Thane Palghar DCC Bank : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महायुतीचे नवे पर्व

ठाणे-पालघर जिल्ह्यात राजकीय बदलाचे वारे

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पहिल्यांदा महायुतीचा झेंडा फडकला असून बहुजन विकास आघाडीची सत्ता मोडीत काढण्यास भाजपाला यश आले आहे. या बँकेच्या इतिहासातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी यांच्या सत्तेनंतर आता भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवे पर्व सुरु झाले आहे. याचा परिणाम ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील राजकारणावर होऊन महाविकास आघाडीला पुन्हा उभारणी घेणे कठीण असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे जिल्हा सहकारी बँक ताब्यात घेण्यासाठी शिवसेना-भाजप युतीचे अनेक वर्षांपासून प्रयन्त सुरु होते. मात्र सहकार विभागात फारसे लक्ष देण्यात न आल्याने शिवसेनेला कधी यश आले नव्हते. बँकेच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपने दुर्लक्ष केल्याने आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व कायम होते. मात्र आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपचे कमळ हाती घेतले आणि बँकेत राजेश पाटील, भाऊ कुऱ्हाडे यांच्या रूपाने भाजपचा प्रवेश झाला. त्यानंतर भाजपने बांधणी करण्यास सुरुवात केली.

काही वर्षानंतर माजी राज्य मंत्री कपिल पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपकडून खासदारकी मिळविल्याने सहकार विभाग अधिक भक्कम गेला आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हस्तक्षेपामुळे आज बँकेवर सत्ता मिळविण्यास भाजपाला यश आले. दुसरीकडे शिवसेनेने दुर्लक्षित केलेल्या बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रणनीती आखली आणि पहिल्यांदा पाच संचालक निवडून आले.

शिवसेनेचा एक संचालक अपक्ष म्हणून निवडून आला आहे. तर बहुजन विकास आघाडीचा एक संचालक एक मताने पराभूत झाल्याने बँकेच्या सत्तेचे गणित बिघडले. त्यात सलग नऊ वर्ष बँकेचे अध्यक्षपद भूषविणारे राजेंद्र पाटील यांचा पहिल्यांदा निवडून आलेला मुलगा मनीष पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्याने वाद होऊन सर्वपक्षिय सहकार पॅनल फुटले आणि बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व निकाली निघाले. सहकार पॅनलने संपूर्ण बहुमत मिळवून परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडविला होता. मात्र पहिले अध्यक्षपद कुणाला द्यायचे यावरून वाद विकोपाला गेला.

भाजपचे सर्वाधिक सात संचालक निवडून आल्याने पहिले अध्यक्षपद भाजपला घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार किसन कथोरे यांना आले आणि सर्व सूत्रे फिरली. बहुजन विकास आघाडीने अध्यक्षपदासाठी आग्रह कायम ठेवला आणि परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपाला मतदान करीत सहकार पॅनलमध्ये भगदाड पडण्यास यश मिळवून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी मंत्री कपिल पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांना शह देत बँक ताब्यात घेतली.

या बदलत्या समीकरणामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व राजकारणही बदलणार असून बहुजन विकास आघाडीसह महाविकास आघाडीला पुन्हा उभारी घेण्यास तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT