ठाणे ः अनुपमा गुंडे
राज्यातल्या बदलेल्या सत्ता समीकरणानंतर पार पडलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणूकीत शहरातील नौपाडा - कोपरी प्रभागावर महायुतीने आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या माजी नगरसेवकांनी या निवडणूकीत पुन्हा विजयाचा झेंडा रोवला आहे.
ठाणे शहर भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. ब्राम्हण, गुजराती बहुल असलेल्या या प्रभागात भारतीय जनता पक्षाला झुकते माप दिले आहे, त्याच मतदारांनी महानगरपालिका प्रभागातही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला हात दिला आहे.
नौपाडा -कोपरी प्रभाग समितीतील मीनल संखे, विकास रेपाळे, मालती पाटील, नम्रता पमनानी, सुधीर कोकाटे, पवन कदम, नम्रता भोसले या शिवसेनेच्या मागच्या निवडणूकीतील जागा राखण्यात शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले. शर्मिला पिंपलोळकर यांनी नौपाडा - कोपरी प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे यंदा या प्रभागात नम्रता फाटक यांच्या ऐवजी त्यांचे पती राजेंद्र फाटक यांनी निवडणूक लढवली होती, त्यामुळे प्रभागातील सत्ता फाटक घराण्याकडेच राहिली आहे.
या विद्यमान नगरसेवकांच्या विरोधात उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) अस्मिता बनकर, रवींंद्र कवळे, अनिल मोरे, सारंग कदम काँग्रेसच्या वृषाली जाधव, मनसेच्या प्रमिला मोरे, सविता चव्हाण, राजश्री नाईक यांनी चांगली लढत दिली, शिवसेना- भारतीय जनता पक्षाने येथे समझोत्याने निवड़णूक लढवली असली तरी ठाकरे बंधूच्या मराठीच्या अस्मितेच्या मुद्द्याने या निवडणूकीचे चित्र या प्रभागात मनसेच्या लढाऊ वृत्तीने बदलते की काय असे चित्र होते, मात्र भारतीय जनता पक्षाच्या नौपाडा - कोपरी प्रभाग समितीतील शिलेदारांनी आपआपले प्रभाग राखले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे सुनेश जोशी यांना अपक्ष उमेदवार किरण नाकती यांनी चांगली लढत दिली. नाकती यांनी नौपाडा विभागात पेरलेल्या कामामुळे ते विजयश्री खेचून आणतील अशी आशा होती, मात्र त्यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांना अपक्ष लढावे लागले.
जोशी यांच्यासह नौपाड्यातील मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी आणि भरत चव्हाण या भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली आहे. संजय वाघुले यांनी पाचव्यांदा विजयी होत आपले प्रभागातील निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे.