Thane municipal elections : आव्हाडांच्या कळव्यात शिंदेचा भगवा

मिशन कळवा 16ः पैकी 13 जागांवर शिवसेनेचा विजय
Thane  municipal elections
आव्हाडांच्या कळव्यात शिंदेचा भगवाpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : श्रद्धा कांदळकर

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजकीय दबदबा ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ढासळला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कळवा परिसरात निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या कळवा व पारसिक परिसरातील प्रभाग क्रमांक 9, 23, 24 आणि 25 मध्ये 16 पैकी तब्बल 13 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे कळव्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः उलथून पडली आहेत.

कळवा, खारेगाव आणि पारसिक नगर येथील चार प्रभागांतील निकाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी धक्कादायक ठरले आहेत. पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. एक जागा पक्षपुरस्कृत अपक्षाकडे गेली असली, तरी एकूण निकाल पाहता कळव्यातील आव्हाडांचा गड मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे स्पष्ट झाले आहे.

Thane  municipal elections
Thane municipal election results : ठाण्यात शिवसेनेचाच गुलाल !

खारेगाव-पारसिक येथील प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले, तर ‌‘ड‌’ विभागातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांनी शिवसेनेचे अनुभवी उमेदवार उमेश पवार यांचा पराभव करत विजय संपादन केला. विशेष म्हणजे, अभिजित पवार यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत मागील तीन टर्म महापालिकेत नगरसेवक राहिलेल्या उमेश पवार यांना पराभूत केल्याने हा विजय वैयक्तिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. मात्र, हा अपवाद वगळता संपूर्ण प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले.

प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली. याच प्रभागात अपक्ष उमेदवार प्रमिला केणी या शिट्टी चिन्हावर विजयी झाल्या. त्या पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सक्रिय होत्या आणि या निवडणुकीत त्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पाठिंबा होता. तरीही, एकूण निकाल पाहता या विजयाने राष्ट्रवादीची पिछाडी भरून निघू शकलेली नाही.

प्रभाग क्रमांक 24 मध्ये तर शिंदे गटाच्या शिवसेनेने संपूर्ण चार सदस्यीय पॅनल निवडून आणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आरती गायकवाड, प्रियंका पाटील, जितेंद्र पाटील आणि संतोष तोडकर या चारही उमेदवारांचा येथे विजय झाला आहे. निकाल कळव्यातील राजकारणात शिंदे सेनेची विजयी पताका ठळकपणे फडकवणारा ठरला.

प्रभाग क्रमांक 25 मध्येही शिवसेनेने तीन जागांवर बाजी मारली. या प्रभागात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खाते प्रकाश बर्डे यांच्या विजयामुळे उघडले असले, तरी एकूण निकालात शिवसेनेचीच सरशी राहिली.

Thane  municipal elections
Panvel municipal election results : पनवेलमध्ये भाजप महायुतीचा दणदणीत विजय

या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या वेदनादायक मुद्दा म्हणजे, मिलिंद पाटील, प्रमिला केणी, अपर्णा साळवी, महेश साळवी, जितेंद्र पाटील, आरती गायकवाड यांसारखे अनेक उमेदवार 2017 च्या महापालिका निवडणुकीत आमदार जितेंद्र आव्हाड आणि दिवंगत नेते मुकुंद केणी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. मात्र कालांतराने या सर्वांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने, त्याच नेत्यांच्या विजयामुळे आव्हाडांना राजकीय विश्वासघाताचा आणि नेतृत्व अपयशाचा तीव्र फटका बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news