Money Pudhari
ठाणे

Maharashtra Artist Pension: मुंबई, जालना, चंद्रपूरमधील हजारो कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत

‘आपले सरकार’वर अर्ज केलेले कलाकार वाऱ्यावर; २०२४ ते २०२६ मधील प्रकरणांवर निर्णय नाही?

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ५० वर्षांवरील ज्येष्ठ कलावंत आणि साहित्यिकांना राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत ५ हजार रूपये मानधन दरमहा दिले जाते.

हे मानधन देण्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर नियुक्त करण्यात येणाऱ्या समित्यांमधील सावळा गोंधळ संपता संपत नाही, मुंबई शहर, जालना आणि चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २ वर्षांपासून समित्यांची स्थापन नसल्याने कलाकारांचे मानधन मिळू शकलेले नाही.

राज्यातील अनेक जिल्ह्यातही समित्या अस्तित्वात असल्या तरी त्यांच्या बैठका वेळेवर होत नसल्यामुळे हजारो कलाकारांचे मानधन रखडले आहे. आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कलाकारांच्या अर्ज मंजूरीपासूनची प्रकिया खोळंबली असल्याने ते कलाकारही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात सध्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या घटत असल्याने विदर्भ, मराठवाड्यातील लोककलावंतांना हे तुटपुंजे का होईना मानधन संजीवनी असताना ते ही केवळ प्रशासकीय त्रुटीमुळे वेळेवर मिळत नाही.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ कलावंतांना ज्येष्ठ लोककलावंतांना शासनाकडून मिळणाऱ्या मानधनासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला प्रशासकीय दिरंगाई भोवत आहे. आपले सरकार या शासनाच्या पोर्टलवरून अर्ज करूनही अनेक ज्येष्ठ लोक कलावंतांच्या मानधनाची सुमारे १७ हजार प्रकरणे विविध जिल्ह्यांमध्ये प्रलंबित आहेत.

कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ मोलाचे कार्य केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना, ज्येष्ठ कलाकारांना शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १९५४-१९५५ पासून मानधन दिले जाते.

यापूर्वी हे मानधन श्रेणीनुसार दिले जात होते. अ वर्ग श्रेणीतील कलाकारांना ३ हजार १५०, ब - २७०० तर क - साठी सुमारे २,२५० रूपये मानधन दिले जात होते.

२०२४ मध्ये शासनाने या मानधनात वाढ करून राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेंसाठी पात्र ज्येष्ठ कलाकारांना ५ हजार रुपये मासिक मानधन देण्यास प्रारंभ केला. या योजनेतंर्गत राज्यातील सुमारे ३८ हजार कलाकार व साहित्यिक या योजनेसाठी पात्र आहेत.

सांस्कृतिक कार्य विभागाने जिल्हानिहाय प्रलंबित अर्जांची संख्या जाहीर करून संबंधित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, तसेच जिल्हा समित्यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा.
-सुभाष जाधव राष्ट्रीय अध्यक्ष, ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई मध्यवर्ती संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT