Inmate Behavior Analysis
ठाणे : सीरियल किलर आणि बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास पाश्चिमात्य देशांमध्ये केला जातो. भारतात अजून असा अभ्यास झालेला नाही. त्याची गरज ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व कारागृहांतील सीरियल किलर आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषी ठरलेल्या बंदिवानांच्या मानसिकतेच्या संशोधनाचा क्रिमिनॉलॉजी रिसर्च प्रोजेक्ट अर्थात ‘रुद्र’ प्रकल्प राबविण्याचा महत्त्वपूर्व निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील एफबीआयच्या धर्तीवर असे संशोधन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे या शहरांमध्ये 1990 ते 1996 या काळात भीक मागणे, चोरी करण्यासाठी 42 लहान मुलांचे अपहरण करून त्यांची क्रूर हत्या करणार्या अंजना गावित, तिची मुलगी सीमा गावित व रेणुका गावित या सीरियल किलर माय-लेकींच्या क्रूर कृत्याने सारा देश हादरला होता. अशा प्रकारच्या सीरियल किलर आणि सीरियल बलात्कार करणार्या आरोपींच्या मानसिकतेचा, त्यांच्या सामाजिक, आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास कधी झालेला नाही. अशा सीरियल किलर, बलात्कारी, घृणास्पद गुन्हेगारांची मानसिकता आणि त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करून त्या गुन्ह्यामागील कारणमीमांसा पश्चिमी देशांमध्ये केली जाते.
त्यातून गुन्ह्याचा उलगडा आणि पुढील गुन्हेगारी रोखण्यास मदत होते. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयमध्ये गुन्हेगारांच्या मानसशास्त्रीय अभ्यासाचे प्रसिद्ध मॉडेल आहे. त्याच मॉडेलच्या धर्तीवर अथर्व पंकज देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील सीरियल किलर आणि बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्हेगारांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्याच्या क्षेत्रात मोलाचे संशोधन केले. त्यांच्या संशोधन पत्रिकेला जर्नल ऑफ फॉरेन्सिक मेडिसीन सायन्स अँड लॉमध्ये प्रकाशनासाठी मान्यता मिळाली आहे.
हेच संशोधन देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी मध्यवर्ती कारागृह अमरावती आणि नागपूर येथील सीरियल किलर आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांवर केले आहे.
काळाची गरज ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्व तुरुंगांत पुढील दहा वर्षांकरिता क्रिमिनॉलॉजी रिसर्च प्रोजेक्ट अर्थात ‘रुद्र’ प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली. त्यासंबंधीचा करार 7 मे 2025 रोजी राज्य सरकारने संबंधित कंपनीशी केला. यामुळे सीरियल किलर आणि बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांच्या मानसिकतेचा पूर्णवेळ अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा झाला.