

The pond in Narivli Tunnel will finally be closed.
नेवाळी : पुढारी वृत्तसेवा
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात ठाणे तालुक्यातील भारतीय रेल्वेच्या नारिवली येथील बोगद्यात पाणी साचले होते. बोगद्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या संदर्भातील वृत्त दैनिक पुढारीने 28 मे रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर आता रेल्वे विभागाकडून बोगद्यातील दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून आता तलावाचे स्वरूप बोगद्याला येणार नसल्याचे उपस्थित रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
कल्याण ग्रामीण भागातील 14 गावांमध्ये असलेल्या नारिवली येथील बोगद्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना प्रवास करण्यासाठी प्रचंड अडचण निर्माण होत होती. याचा त्रास नागरिकांना होत होता. स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडूनही नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर या संदर्भातील वृत्त दैनिक पुढारीने प्रकाशित केल्यानंतर आता रेल्वेने तातडीने बोगद्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
मलंगगड भागासह बाळे, नारिवली या गावांना थेट दहिसर, उत्तरशिव परिसराशी जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. मात्र मुसळधार पावसात तो पाण्याखाली जात असल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेर दैनिक पुढारीच्या वृत्तानंतर रेल्वेने काम हाती घेतल्याने 14 गावातील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.