

ठाणे : पुढारी वृत्तसेवा
ठाणे जिल्ह्यात राज्य आरोग्य विभागाच्या कर्करोग जनजागृती आणि निदान मोहिमेअंतर्गत फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत 4490 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 237 रुग्णांमध्ये कर्करोगाचे संशयित लक्षणे आढळून आली आहेत. जिल्ह्यात कार्यरत असणार्या कर्करोग मोबाईल व्हॅनच्या टीमकडून ही तपासणी करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व सहजसुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कर्करोग मोबाइल व्हॅन कार्यरत असून, नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत आहे. या व्हॅनसुविधेद्वारे मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची मोफत तपासणी केली जात आहे. सध्या ही सेवा भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ यांसह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये उपलब्ध आहे.
व्हॅनमध्ये कॉल्पोस्कोप, डेंटल चेअर आणि इतर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असून, दोन डॉक्टर आणि सहा कर्मचारी कार्यरत आहेत. दररोज सरासरी 100 ते 120 नागरिकांची तपासणी केली जात आहे. तपासणीत संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील निदान व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले आहे.
कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची वेळेवर ओळख होत नाही. त्यामुळे अनेकजण निर्धास्तपणे वावरत असतात. मात्र अचानक कर्करोगाचे निदान झाल्यावर मनात नको ती शंका निर्माण होते. त्यामुळे वेळोवेळी शारीरिक तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यावर यापासून बचाव करता येणे शक्य आहे. या मोबाईल बसमुळे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार मिळणे शक्य होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवण्यात येत आहे.
अशी आहे व्हॅनची रचना
व्हॅनमध्ये तपासणी कक्ष आहे
स्तन, गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी कॉल्पोस्कोप यंत्र आहे.
मुख कर्करोग तपासणीसाठी
डेंटल चेअर आहे.
व्हॅनमध्ये दोन तज्ज्ञ डॉक्टरांसह
6 कर्मचारी आहेत.
फेब्रुवारी 2025 व मे 2025 या दोन महिन्यातील कालावधीत एकूण 4490 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 237 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले आहे.