Maharashtra industrial crisis pudhari photo
ठाणे

Maharashtra industrial crisis : उद्योगबंदीचा मुंबई, पुणे व ठाण्याला मोठा फटका

तीन जिल्ह्यांमध्ये २३ हजारांहून अधिक उद्योग बंद

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्याची औद्योगिक आणि आर्थिक घडी मजबूत करणाऱ्या मुंबई बरोबरच पुणे आणि ठाणे या प्रमुख जिल्ह्यांमध्येच २३ हजारांपेक्षा अधिक उद्योग बंद झाले असून गेल्या पाच वर्षांत राज्यभरात जवळपास ३६ हजार उद्योग बंद पडल्याने औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हान गंभीर बनले आहे.

उद्योग बंद होण्याचा परिणाम केवळ कारखान्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून व्यापार, बांधकाम, शेती आणि सेवा क्षेत्राची साखळीही त्यातून प्रभावित झाली आहे.उद्योग वाढीसाठी अपुरे असणारे क्षेत्रफळ,आय टी पार्कचा विस्तार आणि सेवा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने या उद्योगांना मोठी घरघर लागली आहे.

मुंबई, ठाणे आणि पुणे हे राज्याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे औद्योगिक आणि सेवा केंद्र मानले जातात. या भागातील उद्योगांभोवती हजारो लघु-मध्यम उद्योग, पुरवठादार, वाहतूकदार, गोदामे, दुरुस्ती केंद्रे, खानावळी आणि विविध सेवा व्यवसाय उभे राहिले आहेत. एखादा मोठा उद्योग बंद झाल्यानंतर त्याच्यावर अवलंबून असलेल्या या व्यवसायांवरही परिणाम होतो. त्यामुळे एका उद्योगाच्या बंद होण्याची झळ अनेक छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचते.

राज्यातील मुंबई,ठाणे आणि पुणे या तीन प्रमुख जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षात जवळपास २३ हजारांपेक्षा अधिक उद्योग बंद झाले असून या उद्योग बंदीचा फटका इतर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर आयटी पार्क आणि व्यावसायिक संकुले उभी राहिली. त्यामुळे पारंपरिक उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या जागेवर मोठा दबाव निर्माण झाला.

वाढते जागेचे दर, भाडे, उत्पादन खर्च आणि विस्तारासाठी जागेची कमतरता यामुळे काही कंपन्यांनी इतर शहरांकडे किंवा औद्योगिक वसाहतींकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. काही उद्योगांचे स्थलांतर झाले, तर काहींनी उत्पादनच बंद करण्याचा मार्ग स्वीकारला आहे .विशेषतः ठाणे आणि मुंबई परिसरात औद्योगिक जमिनींचे व्यावसायिक वापरात होणारे रूपांतर हा चर्चेचा विषय ठरला आहे. एकेकाळी मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये आता कार्यालयीन संकुले, आयटी पार्क आणि निवासी प्रकल्प वाढताना दिसत आहेत. त्यामुळे पारंपरिक उत्पादन उद्योगांची संख्या कमी होत आहे.

उद्योग बंद होण्याची कारणे केवळ बाजारातील बदल किंवा जागेची कमतरता यापुरती मर्यादित न ठेवता त्यामागील आर्थिक, प्रशासकीय आणि पायाभूत अडचणींचा स्वतंत्रपणे अभ्यास होणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या उद्योगांच्या स्थलांतरासोबत त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो छोट्या व्यवसायांचेही अस्तित्व धोक्यात येऊ शकते. राज्याच्या आर्थिक विकासासाठी नवीन गुंतवणुकीइतकेच जुन्या उद्योगांचे संरक्षण आणि रोजगार टिकविणेही आता महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्योग बंद होण्याचा सर्वात थेट परिणाम कामगारांवर झाला आहे. कारखाने बंद झाल्यानंतर कायमस्वरूपी कामगारांसोबतच कंत्राटी कामगार, वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, दुरुस्ती कामगार आणि इतर सेवा पुरवठादारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे . त्यामुळे उद्योगबंदीमुळे निर्माण होणारी बेरोजगारी ही केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही.

बंद पडलेल्या कंपन्यांची संख्या

मुंबई: १२,००९

पुणे: ६,४३३

ठाणे: ४,७०४

नागपूर: १,४७८

नाशिक: ८४०

रायगड: ८२२

छत्रपती संभाजीनगर: ६५४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT