मेबेल कोरिया pudhari photo
ठाणे

Mabel Correa : भाजपच्या मेबेल कोरिया यांचे नगरसेवक पद धोक्यात?

जात पडताळणी समितीकडून १६ नोव्हेंबरला सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : राजू काळे

मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आलेल्या भाजप नगरसेविका मेबेल कोरिया यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर निवडणुकीतील त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या (शिंदे गट) सरिता शिंदे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आक्षेप नोंदवून तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल घेत समितीने मेबेल यांना १६ नोव्हेंबर रोजी सुनावणीची नोटीस बजावली आहे.

गेल्या मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मध्ये ओबीसीसाठी राखीव असलेल्या जागेवरून मेबेल या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.निवडणुकीवेळी मेबेल यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्र प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १५ जानेवारी २०२७ पर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिली आहे.

तत्पूर्वी मेबेल यांच्या जात वैधतेवर निवडणुकीतील त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदे शिवसेनेच्या सरिता शिंदे यांनी आक्षेप घेत जात पडताळणी समितीकडे तक्रार नोंद केली. त्यात मेबेल यांचे माहेरचे नाव मेबेल लुईस फरेरा असे असून त्यांचा जन्म १९७१ मध्ये मुंबई उपनगरमधील मनोरी, मालाड येथे झाला आहे. शिक्षण मनोरी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले आहे. ऍम्बरोस यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात ओबीसी जात नमूद नाही. मात्र शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिक येथे झाल्याचे दर्शविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ऍम्बरोस व मेबेल यांच्या वयात केवळ १२ वर्षांचे अंतर असल्याचे समोर आले असताना मेबेल यांनी वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात खाडाखोड करून त्यांचे शिक्षण मुंबईच्या धारावी येथील शाळेत झाल्याचे नमूद केले. यावरून जात प्रमाणपत्रासाठी सादर केलेला वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला खोटा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. ही बाब पोलीस दक्षता पथक यांच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केली असून पोलीस निरीक्षक वैशाली कोकाटे यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन तेथील जनरल रजिस्टरची पडताळणी केली आहे.

समितीने मेबेल यांना १ जुलै २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविल्यानंतर त्यांना आपले वडील व आजोबा यांचे कायम वास्तव्य मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी येथे असल्याचे सिद्ध करता आलेले नाही. यानंतरच्या चार महिन्यांमध्ये देखील मेबेल यांना समितीला समाधानकारक उत्तर देता आले नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

याचप्रमाणे मेबेल यांनी जात प्रमाणपत्रासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेले मुंबई महानगरपालिका सन १९६७ ते १९७२ दरम्यानचे मतदार प्रमाणपत्र देखील खोटे असल्याचे शिंदे यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले आहे. समितीने मेबेल यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १५ जानेवारी २०२७ रोजीची मुदत दिली असून शिंदे यांच्या तक्रारीवर १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यात मेबेल यांनी समितीला समाधानकारक उत्तर देऊन तसा सक्षम पुरावा सादर केल्यास त्यांचे नगरसेवक पद शाबूत राहणार आहे. मात्र तसे न झाल्यास त्यांच्या नगरसेवक पदावर टाच येऊन ते रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१९४५ व १९५५ मध्ये मेबेलच्या आत्याने जमिनीमध्ये बदल केल्याचे भक्कम पुरावे असून समितीकडे केलेल्या तक्रारीतील सर्व मुद्द्यांना उत्तर देण्यात आले आहे. लवकरच आवश्यक कागदपत्रे समितीला सादर केली जाणार असून विरोधक मात्र विनाकारण आरोप करू लागले आहेत.
नोएल कोरिया, मेबेल यांचे पती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT