

माणगाव : सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, घनदाट जंगल, जैवविविधता आणि नैसर्गिक जलसंपत्ती ही माणगाव तालुक्याची खरी ओळख आहे. मात्र, विकासकामांसाठी वाढवलेली गौण खनिजांची मागणी आणि डोंगर उत्खननाच्या प्रकारांमुळे या निसर्गसंपदेवर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्ग, माणगाव बायपास, कोकण रेल्वे दुपदरीकरण, दिघी- पुणे महामार्ग तसेच मोठमोठ्या इमारती आणि घरांच्या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर माती, मुरूम, डबर, खडक, खडी, दगड आणि ग्रीटचा वापर होत आहे. या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील डोंगरांचे उत्खनन वाढल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
कोस्ते बुद्रुक, बामणोली परिसर आणि माणगाव-दिघी महामार्गालगतच्या भागांत डोंगर पोखरले जात असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहेत. विशेष चिंतेची बाब म्हणजे संरक्षित पर्यावरण क्षेत्रातही उत्खनन झाल्याचे आरोप होत आहेत. या क्षेत्रांमधील उत्खननाची व्याप्ती, परवानग्या आणि पर्यावरणीय नियमांचे पालन यांची प्रशासनाने तातडीने पडताळणी करणे आवश्यक आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने माती, मुरूम व दगड काढले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही ठिकाणी रात्रीच्या वेळीही उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आहेत.
विकासकामे सुरू; मात्र वनसंपदेचे काय?
महामार्ग, रेल्वे, बायपास आणि बांधकामे ही विकासाची गरज आहे. मात्र, या विकासासाठी लागणारा कच्चा माल मिळवताना डोंगरांचे नैसर्गिक अस्तित्वच धोक्यात येत असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
डोंगरांवरील झाडांची तोड, वनस्पतींचा नाश आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे परिणाम यामुळे जैवविविधतेचे संतुलन बिघडण्याची भीती आहे. एकीकडे वृक्षारोपणाच्या मोहिमा राबवल्या जातात, तर दुसरीकडे डोंगर पोखरून वनसंपदेचा ऱ्हास होत असेल, तर पर्यावरण संवर्धनाचा नेमका अर्थ काय?
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निसर्गाचा विनाश
महसूल, खनिकर्म आणि वनविभागाने संयुक्त सर्वेक्षण करून तालुक्यातील सर्व खाणी, क्रशर आणि उत्खनन क्षेत्रांची तपासणी करावी. संरक्षित पर्यावरण क्षेत्रातील उत्खननाच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करावी. परवानगीपेक्षा अधिक किंवा विनापरवाना उत्खनन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. उत्खननामुळे बाधित झालेल्या वनक्षेत्राचे आणि जलस्रोतांचेही परीक्षण करावे. रस्ते होतील, इमारती उभ्या राहतील, रेल्वे धावेल; पण एकदा नष्ट झालेली वनसंपदा, पोखरलेले डोंगर आणि आटलेले नैसर्गिक जलस्रोत पुन्हा पूर्ववत करणे सहज शक्य नाही. विकासाच्या नावाखाली सह्याद्रीच्या अस्तित्वाशी तडजोड होता कामा नये. आज डोंगर वाचवले नाहीत, तर उद्या पाणी, शेती आणि पर्यावरण वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. माणगावचा विकास निसर्गाचा विनाश करून नव्हे, तर निसर्गाला सोबत घेऊनच व्हायला हवा!
जलस्रोत, शेती आणि मानवी जीवन धोक्यात!
डोंगर पावसाचे पाणी जमिनीत मुरवून नैसर्गिक झरे, ओढे आणि भूजलसाठे टिकवून ठेवतात. अनियंत्रित उत्खननामुळे या नैसर्गिक जलव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. क्रशरमधून उडणारी धूळ शेतजमिनी आणि फळबागांवर साचून शेतीच्या उत्पादनावर परिणाम करू शकते. डोंगरांचे उतार कमकुवत झाल्यास पावसाळ्यात मातीची धूप, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोकाही वाढू शकतो.