ठाणे : मुंबई, पुणे, आणि ठाणे सारख्या मोठ्या शहरात रोजगाराच्या शोधत गाव आणि घरापासून दूर आलेला तरुण वर्ग. आपल्या भविष्याला चांगला आकार देण्यासाठी मोठ्या शहरात स्थलांतरित होतात तसेच मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या तरुणवर्गाला काही वेळा आपल्या कुटुंबापासून, घरापासून, गावापासून कामानिमित दूर रहावे लागते. इतर सण सोहळ्यादरम्यान मोठ्या शहरांमध्ये असा तरुणवर्गाला ऐन दिवाळी सणातसुद्धा एकटेपणा जाणवतो. कमावण्यासाठी काही गमवावे लागते असा नियम एखाद्या वेळी खरा असल्याचे अशा तरुणवर्गाला भासते. कामात व्यस्त राहिल्याने अनेकदा काही तरुणांना आपल्या कुटुंबासोबत, गावातल्या मित्रांसोबत दिवाळीसारखे सण सुद्धा साजरी करता येत नाही.
दिवाळी सण सुखाचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सण आहे. त्याचप्रमाणे दिवाळी सणात बहुतांश माणसं आपल्या कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करत असतात. तसेच भरपूर प्रमाणात दिवाळीनिमित आपआपल्या गावी जातात. दिवाळी सणाची शोभा जरी फटाके, रांगोळी, फराळ , दिव्यांच्या रोषणाईत असली तरीही आपल्या आपुलकीच्या माणसांसोबत सण साजरा करण्यात काही वेगळाच आनंद असतो. मात्र असे असले तरीही काहीवेळा आपल्या भवितव्याला चांगला वळण देण्यासाठी गावातून भरपूर प्रमाणात तरुण मुलं, मुली आपले शिक्षण पूर्ण करून शहरामध्ये कार्यरत होण्यासाठी स्थलांतरित होत असतात. परंतु शहरातील इमारती जरी उंच असल्या तरी त्यात या तणाईला घरची ओढ असतेच असते. मात्र त्यापासून त्यांना वंचित राहावे लागताना दिसून येते.
करिअरसाठी आजच्या तरुणाईने शहराकडे नोकरीच्या निमित्ताने वळवलेली पावले ही शहरात अडकवूनठेवत असल्याने सण असो किंव समारंभ हा नातेवाईकांना विसरूनच करावा लागतो. गावाकडचा तरुण्ा जेव्हा शहरात येतो, तेव्हा गाव छोटे असले तरी आपलुकीने गच्च भरलेले असते. असे म्हणणे काही कुटुंबापासून दूर असलेल्या तरुणांचे आहे. गावातले घर छोटे असले तरी, मायेने, आपुलकीने व प्रेमळ भावनेने नटलेले असतेच. कोकण, विदर्भ, मराठवाडा, घाटमार्गातील गावांमधून भरपूर प्रमाणात तरुणवर्ग रोजगार व शिक्षणासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये स्थलांतर करतात. कालांतराने कंपन्यांमध्ये रुजू होतात. परंतु करियर करत असतानाच कुठे तरी आपलं कुटुंब, घर, आणि गाव दुर्लक्षित होत असल्याची चिंता ही अशा तरुणांना भेडसावतेच.
कामाच्या व्यापात सणांचा विसर
कामाच्या घाईगडबडीत बऱ्याचदा इतर सणांचे भान राहत नाही. परंतु दिवाळी असा सण आहे ज्यात घरात एकटे असलो तरीही बाहेरचे वातावरण सांगून जाते. घराबाहेरच्या फटाक्यांमध्ये, इतर घरांच्या रांगोळ्यांमध्ये आणि एकत्रित, आनंदी दिवाळी साजरी करत असणारे कुटुंब पाहून खरंच जाणवते आपले कुटुंब इथे आपल्या सोबत असायला हवे होते. अचानक अशावेळी डोळे पाणावतात व कुटुंबाची ओढ निर्माण होते. परंतु डोळे पुसून आपल्या कामात मग्न व्हावे व ह्या क्षणी आपल्या परिवाराला चांगले आयुष्य द्यायचे आहे, असा विचार येतो व सारं विसरून आनंदी व्हावे लागत असल्याचे काही तरुणवर्गाचे म्हणणे आहे.