भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील बी. पी. रोडवरील साईबाबा हॉस्पिटलमागील लोकवस्तीत बिबट्याने शिरकाव करीत तेथील पारिजात इमारतीतील एकाच घरातील आईसह तिच्या दोन मुलींवर हल्ला करीत 7 जणांना जखमी केले. जखमींपैकी तीन जण गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित चार जणांवर सामान्य वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. बिबट्याच्या भर नागरी वस्तीतील शिरकावामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
यापूर्वी बिबट्याने भाईंदर पश्चिमेकडील रेल्वेच्या मोकळ्या जागेत शिरकाव केला होता. त्यावेळी त्याने एका श्वानाला ठार केले होते. यावेळी पुढचे पाऊल टाकत बिबट्याने बी. पी. रोडवरील साईबाबा हॉस्पिटल मागील नागरी वस्तीत शिरकाव करून दहशत पसरवली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने याठिकाणी प्रवेश केला.
तो एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत फिरत होता. त्याचा हा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असतानाच सकाळच्या सुमारास पारिजात इमारतीतील बी विंगमध्ये तो दरवाजा खुला असलेल्या फ्लॅट क्रमांक 101 मध्ये शिरला. फ्लॅटमध्ये शिरताच त्याने भारती (55), ख़ुशी (19) व अन्जली मुकेश टाक (23) यांच्यावर हल्ला केला.
या तिघींना बिबट्याने गंभीर जखमी करीत त्यांच्या गळ्यासह डोक्यावर व हाताला तीव्र स्वरूपात चावा घेत अक्षरशः त्यांचे लचके तोडले. त्यांनी आरडाओरड करताच बिबट्या तेथून पसार झाला. त्याने तेथीलच जय कृष्णा धाम या इमारतीच्या ई विंगमध्ये प्रवेश करून त्यातील फ्लॅट फ्लॅट क्रमांक 321 मध्ये राहणारे छगनलाल बागरेचा (48) ) यांच्यावर हल्ला केला.
तसेच त्याने सिद्धार्थ नगरमधील पारस इमारतीत प्रवेश करून श्याम सहानी (19) व राकेश यादव (50) यांच्यावर हल्ला केला. त्याने त्यांच्या हाताला चावा घेत त्यांचे लचके तोडले. तर एकाचे बोटच तोडून टाकले. यानंतर त्याने तलाव रोडवरील द्वारका भवन इमारतीच्या सी विंगमधील फ्लॅट क्रमांक 111 मध्ये राहणारे दीप भौमिक (52) यांच्यावर हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी तत्काळ मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा मागोवा घेतला. तो पारिजात इमारतीतच तळ ठोकून असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांच्या निदर्शनास आले. त्यांनी वेळ न दडवता इमारतीचे सर्व प्रवेशद्वार बंद केले.
बिबट्या इमारतीतच स्थानबद्ध झाल्याने त्या इमारतीतील एकाच घरातील तीन मायलेकींना घराचे लोखंडी ग्रील तोडून बाहेर काढले. त्यांना तत्काळ भाईंदरच्या भारतरत्न स्व. पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उर्वरीत चार जणांपैकी दोघा जखमींनादेखील जोशी रुग्णालयात दाखल करीत इतर दोन जखमींना लगतच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ख़ुशी व अंजली टाक व दीप भौमिक हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जोशी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. तेथून अंजली टाक आणि दीप भौमिक हे अत्यवस्थ झाल्याने त्यांना मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेे. उर्वरित चार जणांवर सामान्य विभागात उपचार करण्यात येत असल्याचे तेथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आ. नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळाला भेट देत नागरी वस्तीत बिबट्याचा शिरकावावर वनविभागाने अटकाव करून घटनेतील जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.
बिबट्याची नॅशनल पार्कमध्ये रवानगी
बिबट्या पारिजात इमारतीत बंदिस्त झाल्यानंतर वनविभागाच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र बिबट्याने वनविभागाच्या पथकाला झुलत ठेवले. अखेर तो त्या घरातील बाथरूममध्ये शिरल्यानंतर वनविभागाच्या पथकाने कॅमेऱ्याद्वारे त्याचा मागोवा घेत त्याला सकाळी 11 ते दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास तब्बल 4.15 तासांनी इंजेक्शन देत बेशुद्ध केले. यानंतर वनविभागाच्या पथकाने त्याला पिंजऱ्यात कैद करीत नॅशनल पार्क येथे नेलेे.