

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस आणि ठाकरे बंधूंनी अंतिम केल्याचे मानले जात असतानाच, मुंबईत भाजपला थोपवण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता महाविकास आघाडी पुन्हा एकदा चाचपडून पाहणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला शनिवारी (दि. 20) मुंबईत येत असून, विदेश दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी ‘मविआ’चे ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राहुल गांधी रविवारी (दि. 21) भारतात परतणार आहेत. त्या दिवशीच ते ‘मातोश्री’शी संपर्क साधतील, असे विश्वासनीयरीत्या समजते.
काँग्रेस हायकमांडने आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवला आहे. मुंबई काँग्रेसचे नेते शिवसेनेशी आघाडी करण्यास अजिबात उत्सुक नाहीत. मात्र, मुंबईत ठाकरे ब्रँडला मानणारे मराठी आणि काँग्रेसची व्होटबँक असलेले दलित-अल्पसंख्याक एकत्र आल्यास शंभरावर वॉर्डांचे चित्र भाजपविरोधी असेल. देशात भाजपला रोखल्याचा वेगळा संदेश जाईल, असे दिल्लीचे मत आहे. त्यासाठी चेन्नीथला यांच्याबरोबरच काँग्रेसचे काही नेते मुंबईत पोहोचत आहेत. ते राहुल गांधींना माहिती देतील. गांधी परिवाराच्या जवळचे असलेले अविनाश पांडे मुंबईत येत आहेत. त्यांनी या दौऱ्यास दुजोरा दिला. गैर भाजप मतांमध्ये फूट नको, यासाठी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यास शिवसेना ‘उबाठा’ तयार असल्याचे समजते.
आम्ही ‘मविआ’चा भाग आहोत, त्यामुळे काँग्रेसची इच्छा असेल तर चर्चा होऊही शकेल, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.परदेश दौऱ्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी परत येणार आहेत. ते परत आल्यानंतर यासंदर्भात अंतिम चर्चा करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकारिणीने आघाडीसंदर्भातला निर्णय घ्यावा, असा धोरणात्मक विचार असतानाही मुंबईचे महत्त्व लक्षात घेता, ती भाजपच्या हातात जाणे थांबवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करून पाहणे गरजेचे वाटते आहे.
यासंदर्भात उच्चस्तरावर हालचाली सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बडे नेतेही यासंदर्भात हस्तक्षेप करता येईल का, या विचारात असल्याचे समजते. राज ठाकरे यांच्या मनसेला आता महाराष्ट्राबाहेर कोणतीही निवडणूक नसल्याने समवेत घेणे शक्य आहे,असेही कारण समोर केले जाते आहे.
शिवसेना ‘उबाठा’चे नेते आणि विरोधी पक्षाचा बुलंद आवाज असलेल्या संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सध्या तरी काँग्रेस आमच्याबरोबर नाही, असे विधान केले होते. या ‘सध्या तरी’चा नेमका अर्थ आता उलगडण्यास सुरुवात झाली आहे काय? काँग्रेस आणि शिवसेना ‘उबाठा’च्या ऐक्यामुळे लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील महायुतीची घोडदौड महाराष्ट्रात थांबवता आली होती.
आताही दलित, मुस्लिम आणि मराठी, असे समीकरण अस्तित्वात आले; तर मुंबईचा सामना भाजपसाठी अत्यंत कठीण होईल, असा आराखडा मांडला गेला आहे. शिवसेना ‘उबाठा’, काँग्रेस वेगवेगळे लढले तर मात्र चित्र वेगळे असेल. फुटीचा लाभ महायुतीला होऊ शकेल, अशी आकडेवारी तयार झालेली आहे.
मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र प्रारंभापासूनच दलित-अल्पसंख्याक मते ही आता शिवसेनेकडे जाऊ नयेत, यासाठी आपण स्वतंत्र लढणे आवश्यक असल्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसने 60 जागांवर विजयी होऊ शकू, असे गणित मांडले असून, स्वबळावर 85 जागांमध्ये काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे केंद्रीय नेत्यांना कळवले गेले आहे. केंद्रीय नेत्यांना मुंबईतील ताकद पुन्हा नव्याने मिळवायची असेल, तर कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवे हे मान्य आहे. मात्र, या स्वबळाचा लाभ भाजपला होऊ नये, यासाठी काही करता आले तर त्यावर विचार करायला हवा, अशी भूमिका आहे.
आज नेते मुंबईत येत आहेत. ते केवळ मुंबई महापालिकेचे नव्हे, तर महाराष्ट्राचे राजकारण त्यांना बघायचे आहे. मात्र, अर्थातच या भेटीत मुंबईविषयी चर्चा प्रामुख्याने होईल, असेही सांगितले गेले आहे. राहुल गांधी आणि ‘मातोश्री’ यांचे उत्तम संबंध आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आक्षेप घेतले जात असताना ठाकरे परिवार त्यांच्या पाठीशी उभा राहिला, हे उल्लेखनीय.
दलित, मराठी आणि मुस्लिम समीकरण फायद्याचे
भारतीय जनता पक्षाला उत्तर भारतीय आणि गुजराती मतांचा आधार असला, तरी मराठी मते त्यांना एक गठ्ठा मिळणार नाहीत. त्यातच या पक्षाच्या विरोधात असलेली दलित, मुस्लिम मते जर महाविकास आघाडीकडे आली, तर मुंबईत शंभरावर जागा जिंकणे सोपे असू शकेल. त्यासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचा विचार पुन्हा एकदा मांडला गेला आहे. दलित, मराठी आणि मुस्लिम असे समीकरण मुंबईतल्या 39 वॉर्डांमध्ये ‘मविआ’ला विजयी ठरवू शकते, असा संख्यात्मक अभ्यास महाविकास आघाडीने केलेला आहे.
मुंबईबाहेर ‘मविआ’ एक
कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर या तीन महापालिकांत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला पराभूत करणे शक्य असल्याचे काँग्रेसचे आकलन आहे. तेथे महाविकास आघाडीतील पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी विदर्भातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. कोल्हापुरात सतेज पाटील यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. मित्रपक्षांना जागा देण्याचे धोरण तेथे स्वीकारले जाईल, असा दिल्लीकर नेत्यांना विश्वास आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.