कल्याण पूर्वेत 'लस कल्याणाची' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद pudhari File Photo
ठाणे

Kalyan East vaccination drive : कल्याण पूर्वेत 'लस कल्याणाची' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कचोरे परिसरातील हिल्स बस्तीत लसीकरणाबाबत जनजागृती जोरात

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

कल्याण पूर्वेतील कचोरे गाव परिसरातील हिल्स बस्तीत 'लस कल्याणाची' या समुदाय-नेतृत्वाखालील लसीकरण उपक्रमांतर्गत भव्य समुदाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. झेडएमक्यू डेव्हलपमेंट या स्वयंसेवी संस्थेने पुढारी न्यूजच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण ब्लॉकमध्ये नियमित लसीकरणाचे प्रमाण वाढवणे, पालकांमधील गैरसमज दूर करणे आणि समुदायातील विश्वासू लोकांच्या माध्यमातून जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात शोभा यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित समुदाय सदस्यांचे स्वागत करत 'लस कल्याणाची' गटाची उद्दिष्टे, उपक्रम आणि लसीकरणातील समुदायाच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. रहीम खान यांनी उपक्रमाच्या आजवरच्या कामगिरीची माहिती दिली. 'लस कल्याणाची' व्हॉट्सअॅप चॅनलची ओळख करून देत क्यूआर कोड स्कॅन करून चॅनल फॉलो करण्याबाबत मार्गदर्शन केले, ज्यामुळे पालकांना लसीकरणासंबंधी नियमित माहिती व मदत मिळू शकते.

या कार्यक्रमात एकूण ९ की ओपिनियन लीडर्स (KOLs) सकीना, सनम, विनोद, कविता गरुडे, जैतून, श्रीदेवी, शफाक, आशा धिवार आणि हसीना यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यापैकी चार यांनी प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव कथन करत लसीकरणाबाबत समुपदेशन आणि विश्वासनिर्मिती किती प्रभावी ठरते. तसेच विनोद यांनी आपल्या भावाच्या आठ महिन्यांच्या बाळाला वेळेवर लसी न मिळण्यामागील अज्ञानाचा मुद्दा मांडत योग्य समुपदेशनानंतर कुटुंब लसीकरणाबाबत जागरूक झाल्याचे सांगितले.

शफाक यांनी दुष्परिणामांच्या भीतीमुळे दीड वर्षांच्या मुलीचे लसीकरण रखडलेल्या कुटुंबाला स्वतःच्या मुलाचे लसीकरण कार्ड दाखवून कसे पटवले, हे अनुभव सांगितले. तर श्रीदेवी यांनी "मुलगा सुदृढ आहे, लसीची गरज नाही" या गैरसमजावर मात करून कुटुंबाला योग्य वेळापत्रक पाळण्यास प्रवृत्त केल्याचे अनुभव सांगितला.

कविता गरुडे यांनी दिराने समजावून सांगून आईचा विश्वास संपादन करत लसीकरण पूर्ण केल्याचा अनुभव शेअर केला. कार्यक्रमाला नेतीवली, यूपीएचसी, केडीएमसी आरोग्य विभागाचा भक्कम पाठिंबा लाभला. वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास पवार, एएनएम मालती इंगळे तसेच आशा वर्कर्स फरहाना शेख आणि पूनम कांबळे यांनी उपस्थिती दर्शवली. डॉ. पवार यांनी लसीकरणाचे महत्त्व पटवून देत वेळेवर लस देण्याची गरज आणि पालकांच्या शंकांचे निरसन केले.

यावेळी समुदाय सदस्यांनी कचोरे गावात अंगणवाडी नसल्याची समस्या मांडली. यावर डॉ. पवार यांनी वरिष्ठ पातळीवर हा विषय मांडण्याचे आश्वासन दिले.'मिथ विरुद्ध रिअॅलिटी' या परस्परसंवादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शोभा रहीम, नगमा आणि ज्योती यांनी हा उपक्रम राबवला, लसीकरणाशी संबंधित विधानांवर चर्चा करत समुदाय सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

बहुतांश उत्तरे अचूक असल्याने जनजागृतीची पातळी वाढल्याचे दिसून आले. उपक्रमात सातत्याने योगदान देणाऱ्या यांचा सन्मान म्हणून छोटेखानी भेटवस्तू देण्यात आल्या. अल्पोपहारानंतर अनौपचारिक चर्चा, अनुभवांची देवाणघेवाण आणि नाते दृढ करण्याचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाला एकूण ५६ समुदाय सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी एकत्रितपणे "५ साल ७ बार, छूटे ना टीका एक भी बार" या घोषणेनिशी केला. या कार्यक्रमाला आरोग्य यंत्रणा आणि भागीदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

'लस कल्याणाची' उपक्रमाने कल्याण पूर्वेत लसीकरणाबाबत विश्वास, सहभाग आणि जनजागृती केली असून भविष्यातही अशा उपक्रमांतून समुदाय आरोग्य अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT