Thane landslide risk pudhari photo
ठाणे

Thane landslide risk : ठाण्यात १४ ठिकाणी दरड कोसळण्याची भीती

निवारा जाण्याच्या भीतीने रहिवासी राहताहेत मृत्यूच्या छायेत; घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर ठाण्यातील घरांचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे जीव वाचवण्यासाठी पालिका प्रशासनाचे एकीकडे शर्तीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे ठाण्यातील डोंगराळ परिसरात राहणाऱ्या लाखभर रहिवाशांवर मात्र मृत्यूची टांगती तलवार कायम आहे. पावसाळ्यात दरड कोसळून कधी जीव जाईल, याचा नेम नाही. तरीही घरे सोडण्यास इथले नागरिक तयार नाहीत.

डोंगर परिसर पालिका हद्दीत येत असला तरी जागा वनविभागाची असल्याने पावसाळ्यापूर्वी दोन्ही यंत्रणाकडून केवळ नोटीस देण्याचे सोपस्कार केले आहेत. मात्र दोन्ही यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे मूळ प्रश्न अनेक वर्षे सुटला नसून घाटकोपर दुर्घटनेनंतर डोंगर पट्यातील घरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घाटकोपर येथे दरड कोसळून ६ लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर ठाण्यातील डोंगर पट्ट्यातील नागरिकांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. ठाणे एकीकडे मोठ्या प्रमाणात विस्तारत असताना दुसरीकडे २०-२५ वर्षांपासून डोंगरभागात अनधिकृत वस्तीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली. मतांच्या राजकारणासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी सर्व सुख-सोयी रहिवाशांना पुरवल्या.

या सुखसोयीमुळेच गेल्या अनेक वर्षांपासून लाखभर रहिवाशी येथे राहत आहेत. अक्षरशः डोंगर पोखरून परिसरात मोठ्या प्रमाणात या झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. वागळे इस्टेट पट्ट्यातील डोंगराळ परिसराबरोबरच सर्वाधिक अतिक्रमण हे कळवा, मुंब्रा परिसरातील डोंगराळ भागात झाले आहे. अनेक वर्षांपासून या परिसरात हे नागरिक अनधिकृतपणे राहत असून त्यांना पाणी व वीज कनेक्शन सहज उपलब्ध होते.

कळवा परिसरातील अत्कोनेश्वर नगर, भास्कर नगर, पौडपाडा असा मोठा डोंगराचा परिसर या झोपड्यांनी व्यापला आहे, तर मुंब्रा बायपासवर झोपड्यांचे साम्राज्य प्रशासनाच्या डोळ्यादेखत उभे राहिलेआहे. डोंगर परिसरातील सर्व रहिवाशांना पालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नोटीस देण्यात येते. राहती जागा सोडून जाण्यास सांगितले जाते.

वनविभागाकडून केवळ नोटीस देण्याचे सोपस्कार पाळले जातात. पावसात जायचे कुठे, या विवंचनेत रहिवासी जीव मुठीत घेऊन तेथेच मृत्यूच्या छायेत राहत असल्याचे समोर आले आहे. डोंगर पोखरल्याने धोका वाढला : झोपड्यांसाठी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला जात असल्याने पावसाळ्यात माती भुसभुशीत होत असून परिसरातील नागरिकांना याचा सर्वाधिक धोका आहे.

या भागात कोसळू शकते दरड...

1.लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती

  • गुरुदेव आश्रम जवळ, उपवन

  • माजिवडा मानपाडा प्रभाग समिती

  • डोंगरीपाडा पातलीपाडा कळशीपाडा

2.कळवा प्रभाग समिती...

  • आतकोनेश्वर नगर, पौंडपाड़ा शिवशक्ती नगर, घोलाई नगर वाघोबा नगर, भास्कर नगर मुंब्रा प्रभाग समिती...

    3.आझाद नगर गावदेवी मंदिरजवळील परिसर

  • केणी नगर सैनिक नगर कैलास नगर

डोंगरात नेमक्या झोपड्या किती?

डोंगराळ परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्यांचे साम्राज्य वाढले असून नेमके किती रहिवाशी या परिसरात राहतात याचा सर्व्हेही पालिकेच्या वतीने केलेला नाही. अनेकांनी येथे झोपड्या बांधून त्या भाड्याने दिल्या आहेत. येथील नागरिकांची जास्त संख्या ही परराज्यातून आलेल्या नागरिकांची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT