Konkan Tourists Stranded Pudhari
ठाणे

Konkan Tourists Stranded: आखाती युद्धाचा फटका; कोकणातील 200 पर्यटक दुबई-कुवैतमध्ये अडकले, 41 जणांची सुखरूप घरवापसी

ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड-रत्नागिरीतील नागरिक अडचणीत; विशेष विमानांद्वारे मदत, जिल्हा प्रशासन सतर्क

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : बजरंग वाळुंज

आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोकणातून दुबई आणि कुवैत येथे गेलेले जवळपास 200 पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये ठाण्यातील 53 लोक, सिंधुदुर्गचे 102, रायगड रत्नागिरीचे 64 लोकांचा समावेश आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्री दुबईतून 41 प्रवासी घेऊ न पहिले विमान मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. एअर इंडियाने पर्यटकांच्या परतीसाठी 10 विमाने तैनात केल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे परतीचा प्रवास करण्यासाठी काही नागरिकांकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत. यामुळे हॉटेलचे बिल व खर्च आता देणे अशक्य झाले

असल्याने सरकारने मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून सरकारला केली जात आहेत.

दुबईत अडकलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक 30 प्रवासी हे ठाणे शहरातील आहेत. यामध्ये ठाणे शहर : 30, शहापूर : 13, वासिंद : 1, भिवंडी : 9 अशा प्रवाशांची संख्या आहे. दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांची व्यवस्था दुबई सरकारने केली आहे. तर अरब कंट्रीमधील अन्य देशातील अडकलेल्या भारतीय नागरिकांची व्यवस्था तेथील सरकारने केली आहे. अमेरिका + इस्रायल - ईराणमधील युद्धामुळे दुबईत अडकून पडलेले कल्याण पश्चिमेतील 6 पर्यटक सुखरूप मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप मायदेशी आल्याने

त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.दरम्यान कल्याण पश्चिमेतील डी. बी.जाधव यांच्या कुटुंबातील 6 सदस्य 24 फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. मात्र अमेरिका-इस्रायल-ईराण यांच्यातील युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम इतर देश आणि दुबईपर्यंत पोहोचल्याने तेथेही हल्ले होत आहेत. अनेक भारतीय पर्यटकांप्रमाणेच जाधव कुटुंबातील 6 जणही अबुधाबीमध्ये अडकून पडल्याने इकडे कल्याणात त्यांच्या कुटुंबीयांचा अक्षरशः जीव टांगणीला लागला होता. या परिस्थितीमुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अबूधाबी येथून सोडण्यात आलेल्या विशेष विमानाने या सहा जणांसह अडकलेले इतर पर्यटकही सुखरूप मुंबईत दाखल झाले आहेत. याच दरम्यान अबुधाबी येथून सुखरूप घरी परतलेल्या कल्याणातील सहा पर्यटकांचे कुटुंबीयांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्या काढून स्वागत करत पर्यटकांसह कुटुंबीयांनी भारत सरकारचे आभार मानले. पर्यटनाचा कालावधी संपून आपल्या मायदेशी निघण्याची वेळ आली आणि युध्दामुळे अडकून पडावे लागल्याने पर्यटकांच्या कुटुंबांमध्ये अस्वस्थता पसरली होती. परंतु भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे दुबईतून काही विशेष विमाने भारतात सोडण्यात आली. या विशेष विमानातून कल्याणमधील अबुधाबीत अडकलेले पर्यटक कुटुंब सुखरूप मुंबईत आणि तेथून कल्याणमधील घरी पोहोचले. भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे आम्ही सुखरूप परतल्याच्या भावना जाधव पर्यटकांनी व्यक्त केल्या.

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची

माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी महसूल व पोलिस विभागाला दिले आहेत. त्यानुसार तालुका व जिल्हास्तरावर माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून संकलित मातीि राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेली आहे.

दरम्यान दुबईतून 41 पर्यटकांची सोमवारी मध्यरात्री घरवापसी झाली यामध्ये कल्याणच्या 6 जणांची घरवापसी झाली. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत एकूण 102 नागरिकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी 11 नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्या नावांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आलेली आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (02362) 228847 / 1077 तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (02362) 228614 या क्रमांकांवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. संबंधितांनी अधिक माहितीसाठी या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आखाती देशांतील परिस्थितीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून केंद्र व राज्य शासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

दुबई विमानतळावर कानठळ्या बसविणारे हल्ले

कल्याणमधील ज्येष्ठ व्यावसायिक डी. बी. जाधव हे गेल्या महिन्यात आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांना घेऊन पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. दुबईत हा कालावधी पर्यटनासाठी सुयोग्य असतो. त्यामुळे अनेक भारतीय आणि देश-विदेशी पर्यटक या कालावधीत पर्यटनासाठी दुबईत असतात. 24 फेब्रुवारी रोजी जाधव आपल्या कुटुंबियांसह दुबईत पोहोचले. पर्यटनाची निश्चित केलेली ठिकाणे पाहिली. त्याचवेळी अचानक मध्य पूर्वेत अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्या घमासान सुरू झाले. इराणने युद्धखोर अमेरिका आणि इस्त्रायल देशांच्या मित्र राष्ट्रांबरोबर हल्ले सुरू केले. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीमधील देशांचा समावेश होता.

इराणच्या हल्ल्यांनी दुबईला लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणने लक्ष्य केले होते. दुबई विमानतळ परिसरात कानठळ्या बसविणारे हल्ले पर्यटकांच्या हृदयाचे ठोके चुकवत होते. त्यातच विमान सेवा बंद करण्यात आली होती. हवाई हल्ल््यांची तीव्रता वाढल्याने अडकून पर्यटक पडलेले देवाचा धावा करून विमान सेवा लवकरात लवकर सुरू करावी, तसेच भारत सरकारने विशेष विमान सेवा सुरू करून आम्हाला सुखरूप भारत देशात घेऊन जावे, यासाठी पर्यटकांनी आपापले व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून भारत सरकारकडे आपल्या व्यथा मांडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT