

मुंबई : काठीण्य पातळी अधिक असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) जानेवारी 2026 सत्राचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत हरियाना, कर्नाल येथील दीक्षा गोयल हिने 486 गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियोजनबद्ध तयारीच्या जोरावर तिने 81 टक्के गुण मिळवले आहेत. तर दुसरा क्रमांक हिमाचल प्रदेश मधील पाओंटा साहिब येथील अनिरुद्ध गर्ग यांनी 452 गुणांसह मिळवला, तर ऋषभ जैन (नवी दिल्ली) आणि ध्रुव देंबला (सोनीपत) हे समान गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
ग्रुप 1 मध्ये 53 हजार 652 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 11 हजार 282 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या ग्रुपचा निकाल 21.03 टक्के लागला. तर ग्रुप 2 मध्ये 38 हजार 169 विद्यार्थ्यांपैकी फक्त 3 हजार 726 जणांना यश मिळाले आहे. ग्रुपचा निकाल 9.76 टक्के इतका लागला आहे.
जानेवारी महिन्यात घेतलेल्या या परीक्षेसाठी तब्बल 69 हजार 591 जण बसले होते. देशात आणि परदेशातील अशा 576 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. ग्रुप 1 मध्ये तुलनेने समाधानकारक निकाल लागला असला, तरी ग्रुप 2 आणि दोन्ही ग्रुप एकत्रित उत्तीर्णतेचे प्रमाण कमी असल्याने परीक्षेची काठिण्यपातळी उच्च असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. या निकालात
दोन्ही ग्रुप एकाचवेळी पार करणाऱ्यांची संख्या केवळ 2 हजार 446 इतकीच ठरली. त्यामुळे एकत्रित उत्तीर्णतेचे प्रमाण अवघ्या 10.97 टक्क्यांवर आहे. आयसीएआयचे अध्यक्ष प्रसन्न कुमार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले. सीए अंतिम परीक्षा अत्यंत कठीण असली, तरी विद्यार्थ्यांची चिकाटी आणि नियोजनबद्ध तयारी त्यांना यशाच्या शिखरावर पोहचवते. नव्या चार्टर्ड अकाउंटंट्सनी नैतिक मूल्ये जपत देशाच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलावा, असे त्यांनी नमूद केले आहे.
सप्टेंबर 2025 सत्राच्या तुलनेत जानेवारी 2026 च्या सीए अंतिम परीक्षेच्या निकालात स्पष्ट घट झाल्याचे दिसून येते. सप्टेंबर सत्रात ग्रुप 1 चा निकाल 24.66 टक्के होता; तर जानेवारीत जाहीर झालेला निकाल 21.03 टक्क्यांवर आला. ग्रुप 2 मध्ये तर अधिक मोठी घसरण झाली असून 25.26 टक्क्यांवरून तो थेट 9.76 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे दिसून येत आहे. दोन्ही ग्रुप एकत्रित उत्तीर्णतेतही लक्षणीय घट झाली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये हा निकाल 16.23 टक्के होता; हा निकाल 10.97 टक्क्यांवर घसरला. मूल्यमापनातील कडक निकष आणि
प्रश्नपत्रिकेची वाढती कठीणता पुन्हा अधोरेखित झाली असून, सीए अंतिम परीक्षा ही अजूनही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचे या निकालातून दिसून येत आहे.