कोकणात प्रस्थापितांना धक्के! 
ठाणे

Konkan Nagar Parishad Election 2025 : कोकणात प्रस्थापितांना धक्के!

चव्हाण पॅटर्न ठाण्यात प्रभावी, सिंधुदुर्गात नितेश राणेंना धक्का

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये कोकणात प्रस्थापितांना धक्के मिळाल्याने 50 टक्क्यांपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये सत्तांतर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या वर्चस्वाला हादरा बसला. शिंदेंच्या शिवसेनेने सर्वाधिक नगरपरिषदा जिंकत आपले स्थान अधिक भक्कम केले.

कोकणात एकूण 27 नगरपालिकांची निवडणूक झाली. यामध्ये 27 पैकी सिंधुदुर्गातील 4 नगरपालिकांपैकी भाजप 2, शिवसेना 2, रत्नागिरी जिल्ह्यातील 6 नगरपालिकांपैकी राजापूर - काँग्रेस, रत्नागिरी, चिपळूण, खेड - शिंदे शिवसेना, लांजात शिवसेना, तर रायगडमध्ये श्रीवर्धन यूबीटी, महाड - शिंदे शिवसेना, रोहा - राष्ट्रवादी, मुरूड - राष्ट्रवादी, अलिबाग - शेकाप, माथेरान-शिवसेना, पेण-भाजप, उरण - राष्ट्रवादी शरद पवार, कर्जत - राष्ट्रवादी, खोपोली-शिंदे शिवसेना, अंबरनाथ - भाजप, बदलापूर - भाजप, वाडा - भाजप, जव्हार - भाजप, डहाणू - शिवसेना, पालघर - शिवसेना, असे निकाल लागले आहेत. एकूण 27 पैकी भाजपकडे 9 , शिंदेंची शिवसेना 10, उद्धव ठाकरे शिवसेना 2, शरद पवार राष्ट्रवादी 1, अजित पवार राष्ट्रवादी 3, असा निवडणूक निकाल लागला आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना कोकण पट्ट्यात महायुती आणि शिवसेना (शिंदे गट) यांचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये महायुतीने मोठा दबदबा निर्माण केला असून अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांनी आपले गड राखण्यात यश मिळवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख नगरपंचायतीत नऊपैकी सात नगरसेवक महायुतीचे विजयी झाले असून भाजपचा एक अपक्ष बंडखोर उमेदवारही निवडून आला आहे. गुहागर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या निकालामुळे शिवसेना नेते भास्कर जाधव यांना गुहागरमध्ये पराभव स्वीकारावा लागला असून, हा त्यांच्या राजकीय प्रभावाला मोठा धक्का मानला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड नगरपरिषदांवर शिवसेना (शिंदे गट) यांनी आपला झेंडा कायम राखला आहे. तसेच लांजा नगरपंचायतीवरही शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली आहे. देवरुख आणि गुहागर नगरपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व सिद्ध केले आहे. राजापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी विजय मिळवला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदेश कलमकर आघाडीवर असून, त्यांना 318 मते मिळाली आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना (शिंदे गट) चे सुनील कविस्कर यांना 267 मते मिळाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगरपरिषदेत भाजपने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. येथे शिंदे सेनेच्या लीना समीर म्हापणकर यांच्यासह भाजपचे रवींद्र रमाकांत शिरसाट, गौरी माईनकर, प्रीतम सावंत, विनायक गवंडकर, गौरी मराठे, आकांक्षा परब आणि तातोबा पालयेकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि उबाठा गट यांच्यात मिश्र निकाल लागला आहे. भाजपच्या दीपाली भालेकर, सुधीर आडीवरेकर, दुलारी रांगणेकर, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर आणि मोहिनी मडगावकर यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे तौकीर शेख, शिंदे सेनेच्या सायली दुभाषी व खेमराज कुडतरकर, तर उबाठा गटाचे देवेंद्र टेमकर हे उमेदवारही निवडून आले आहेत.

मालवण नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाकडून मंदार केणी, दर्शना कासावकर, ललित चव्हाण आणि महानंदा खानोलकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडून दीपक पाटकर, सिद्धार्थ जाधव, पूनम चव्हाण, निना मुंबरकर आणि शर्वरी पाटकर यांनी विजय मिळवला आहे. तर शिवसेना (उबाठा) गटाकडून अनिता गिरकर, अहेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर आणि तपस्वी मयेकर हे उमेदवार निवडून आले आहेत. एकूणच कोकण पट्ट्यातील या निकालांनी महायुती, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची ताकद अधोरेखित झाली असून, आगामी राजकीय समीकरणांसाठी हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.

स्वबळाच्या नाऱ्यामुळे घोडदौड

भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी शत प्रतिशत भाजप असा नारा देत कोकणात सर्वत्र स्वबळाचा नारा दिला. यामध्ये सिंधुदुर्गात 2, ठाण्यात 2, पालघरमध्ये 2, तर रायगडमध्ये 1 नगरपालिका जिंकत भाजप पॅटर्न पुढे नेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT