

आटपाडी: नगरपंचायतच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राजकीय रणांगणावर निर्णायक मुसंडी मारत सत्तेचा झेंडा रोवला. आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भाजपने शिवसेना शिंदे गट व तीर्थक्षेत्र विकास आघाडीला जोरदार धक्का देत नगरपंचायतवर ‘कमळ’ फुलवले.
नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपचे यु. टी. जाधव यांनी शिवसेनेचे रावसाहेब सागर आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सौरभ पाटील यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर ठसा उमटवला. पहिल्याच निवडणुकीत भाजपने दाखवलेली ताकद ही आगामी राजकारणाची नांदी मानली जात आहे.
१७ प्रभागांच्या नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गटाने ८ जागा मिळवत संख्याबळ दाखवले, तर भाजपने ७ जागांवर विजय मिळवून सत्ता केंद्रस्थानी आपली पकड मजबूत केली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेनेने प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५, ८, ९ व १६ मध्ये विजय मिळवला.भाजपने ६, ७, १०, ११, १२, १३ व १५ या प्रभागांमध्ये आपला भगवा फडकावला.राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रभाग १४, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीने प्रभाग १७ काबीज केला.
शिवसेनेकडून स्वाती सातारकर, सावित्री नरळे, अमरसिंह देशमुख, धनाजी चव्हाण, संतोषकुमार लांडगे, निशिगंधा शरद पाटील, अनुजा चव्हाण व बाळासो हजारे विजयी झाले. भाजपकडून ऋषीकेश देशमुख, डॉ. जयंत पाटील, राधिका दौंडे, ललिता जाधव, महेश देशमुख, अजित जाधव व मनिषा पाटील यांनी यश संपादन केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संध्याताई पाटील आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मीनाक्षी पाटील यांनी आपापल्या प्रभागात विजय मिळवला.
प्रभाग १६ मधून शिवसेनेचे बाळासो हजारे यांनी तब्बल ६९१ मतांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला, तर प्रभाग १७ मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मीनाक्षी पाटील यांनी अवघ्या ३ मतांनी थरारक विजय साकारत इतिहास घडवला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी अवघ्या दीड तासांत पूर्ण झाली. निकाल जाहीर होताच संपूर्ण आटपाडी शहरात फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष आणि आनंदोत्सव पाहायला मिळाला. पहिल्याच निवडणुकीत सत्ता हस्तगत करत भाजपने आटपाडीच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे. या ‘कमळफुली’ विजयाची चर्चा आता तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत रंगू लागली आहे.