

मुंबई : नियोजनबद्धरीत्या केलेला झंझावाती प्रचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तळागाळातील कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि तीन प्रमुख पक्षांमध्ये असलेला बऱ्यापैकी समन्वय या जोरावर महायुतीने राज्यात झालेल्या नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठे यश मिळवले. राज्यातील 288 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणूक निकालात महायुतीने जोरदार कामगिरी करत 207 जागांवर आपले नगराध्यक्ष निवडून आणले. महाविकास आघाडीच्या पदरी मात्र निराशाच पडली. या आघाडीला अवघ्या 44 जागांवर मतदारांनी स्वीकारले. एका अर्थाने गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती या निवडणुकांच्या निमित्ताने झालेली दिसून आली.
117 नगराध्यक्षांसह भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 53 जागांवर विजय मिळवला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 37 नगराध्यक्ष निवडून आणले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कामगिरी सर्वांत निराशाजनक राहिली. या पक्षाचे राज्यभरात केवळ 9 नगराध्यक्षच निवडून आले, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 जागांवर विजय मिळाला. चार वर्षांपासून या निवडणुका रखडल्या होत्या.
37 ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि अन्य पक्षांनी बाजी मारली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी आलेल्या या निकालाने भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष केला जात असून महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला आहे. या निकालाने त्यांच्या समोरील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील आव्हान आणखी वाढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर अनुक्रमे 2 डिसेंबर व 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याची एकत्रित मतमोजणी रविवारी 21 डिसेंबर रोजी झाली.
राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या असताना स्थानिक पातळीवर निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी महायुतीतील तीन पक्षातच एकमेकांच्या विरोधात लढत रंगली होती. काही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातच युती झाली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महायुतीने विशेषत: भाजपने राज्यभरात प्रचंड मेहनत घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचे फळ भाजपला मिळाले. विशेषत: नव्यानेच नियुक्त झालेले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्याच्या पातळीवर नेटाने काम केले. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्नासपेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक नगरपरिषदनिहाय स्वतंत्र रणनीती आखली होती. त्याचा फायदा भाजपाला झाला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकहाती प्रचारयंत्रणा राबविली होती. त्यांनीही पन्नासपेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या. तुलनेने विरोधी पक्षाचे बडे नेते प्रचारात दिसले नाहीत. पक्षाकडून कोणतीही रसद मिळत नसल्याने म्हाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढावी लागली. निवडणुकीत काँग्रेसने 27 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष बसविले असले तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाताहत झाली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 ठिकाणी विजय मिळाला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागांवरच समाधान मानावे लागले. आता हे अपयश घेऊन महाविकास आघाडीला महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. या निकालाने महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी वाढले आहे.