Konkan Homestay Pudhari
ठाणे

Konkan Homestay: वर्षभर कुलूपबंद असलेली कोकणी घरे आता पर्यटकांसाठी खुली होणार! ‘होम स्टे’मधून गावांना नवी संधी

नोकरी-शिक्षणासाठी स्थलांतरामुळे अनेक घरे वर्षभर कुलूपबंद; ग्रामीण पर्यटनातून स्थानिकांना रोजगाराची संधी

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण सोनावणे

ठाणे: कोकण म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहतात ती हिरवाईने नटलेली डोंगररांग, समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा, लाल मातीचे रस्ते, कौलारू घरे आणि घराघरातून मिळणारे अस्सल कोकणी आदरातिथ्य.

मात्र या निसर्गरम्य कोकणाच्या दुसऱ्या बाजूला एक गंभीर वास्तवही आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई, पुणे यांसारख्या शहरांकडे झालेल्या मोठ्या स्थलांतरामुळे कोकणातील अनेक गावे दिवसेंदिवस ओस पडत आहेत.

गावातील अनेक घरे वर्षातील बहुतांश काळ कुलूपबंद असतात.याच समस्येला संधीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण आणि घरगुती पर्यटनाच्या योजनांमधून होत आहे.

वर्षभर बंद असलेली कोकणी घरे पर्यटकांसाठी खुली करून त्यांचे ‘होम स्टे’मध्ये रूपांतर करणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि पर्यटकांना कोकणचा अस्सल अनुभव देणे, हा या संकल्पनेमागचा मूलभूत विचार आहे.

कोकणातील घर हे केवळ चार भिंतींचे बांधकाम नाही. त्या घराशी कुटुंबाच्या आठवणी, शेती, बागा, परंपरा आणि गावाशी असलेले नाते जोडलेले असते. मात्र शहरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांमुळे अनेक घरे वर्षानुवर्षे बंद राहतात. घराची नियमित देखभाल होत नाही, परिसराची निगा राखली जात नाही आणि काही वर्षांनी घराच्या दुरुस्तीचा खर्चही मोठा होतो.अशा घरांचे पर्यटनाच्या माध्यमातून पुनर्वापरात रूपांतर झाले तर परिस्थिती बदलू शकते.

घराची डागडुजी करून पर्यटकांसाठी खोल्या उपलब्ध करून देता येतील. त्यातून घराची देखभालही होईल आणि मालकाला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोतही मिळेल. म्हणजेच, आज कुलूपबंद असलेली मालमत्ता उद्या उत्पन्न देणारी मालमत्ता बनू शकते.

कोकणी खाद्यसंस्कृती हा या पर्यटनाचा मोठा आकर्षणबिंदू ठरू शकतो. घावणे, आंबोळी, सोलकढी, माशांचे विविध पदार्थ, फणस, काजू, कोकम, आंबा अशा स्थानिक पदार्थांचा आस्वाद पर्यटकांना घरगुती पद्धतीने घेता येतो. त्यामुळे पर्यटनाचा आर्थिक फायदा केवळ घरमालकापुरता मर्यादित न राहता स्थानिक शेतकरी, मच्छीमार, महिला बचतगट, कारागीर आणि खाद्यपदार्थ उत्पादकांपर्यंत पोहोचू शकतो.

कधीकाळी नोकरी-व्यवसायासाठी शहरांकडे गेलेल्या चाकरमान्यांची घरे आज कुलूपबंद आहेत. उद्या त्याच घरांच्या अंगणात पर्यटकांची वर्दळ, स्थानिक पदार्थांचा सुगंध आणि रोजगाराच्या नव्या संधी दिसू शकतात.कुलूपबंद घरांना पर्यटनाची चावी मिळाली, तर कोकणातील केवळ घरेच नव्हे, तर संपूर्ण गावे पुन्हा जिवंत होण्याची शक्यता आहे.

हॉटेल नव्हे, तर कोकणी घराचा अनुभव...

होम स्टेची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे वेगळेपण. पर्यटकांना एखाद्या पारंपरिक हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा अस्सल कोकणी घरात राहण्याचा अनुभव अधिक आकर्षक ठरू शकतो.कौलारू घर, अंगण, विहीर, नारळ-पोफळीची बाग, घरगुती जेवण, स्थानिक पदार्थ, गावातील सण-उत्सव, शेतीचा अनुभव आणि स्थानिक लोकांशी संवादया सर्व गोष्टी पर्यटनाला वेगळे परिमाण देतात.

एका घरातून अनेकांना रोजगार...

होम स्टेची संकल्पना प्रत्यक्षात आली तर त्याचा सर्वाधिक महत्त्वाचा परिणाम रोजगारनिर्मितीवर होऊ शकतो. घराची देखभाल, स्वयंपाक, साफसफाई, बागकाम, पर्यटकांचे स्वागत, स्थानिक पर्यटनस्थळांची माहिती देणे, वाहनव्यवस्था अशा अनेक कामांसाठी स्थानिक मनुष्यबळाची गरज भासणार आहे. यातून विशेषतः महिलांना आणि तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पर्यटनाशी संबंधित छोट्या व्यवसायांनाही चालना मिळू शकते.

चाकरमान्यांच्या घरांना मिळणार आर्थिक आधार...

मुंबई-पुण्यात राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी ही संकल्पना विशेष महत्त्वाची ठरू शकते. शहरात राहूनही गावाशी असलेले नाते कायम ठेवणाऱ्या अनेक चाकरमान्यांची गावाकडे घरे आहेत. मात्र ती वर्षातील बहुतांश काळ बंद असतात.

या घरांचा नियंत्रित पद्धतीने पर्यटनासाठी वापर करता आला तर घराची देखभाल, सुरक्षा आणि स्वच्छता यांची व्यवस्था स्थानिक पातळीवर करता येऊ शकते. त्याचबरोबर घरमालकाला अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अर्थात, प्रत्येक बंद घराचे व्यावसायिक रूपांतर करणे हा योजनेचा उद्देश नसावा. घरमालकाची इच्छा, स्थानिक पर्यावरण, गावाची क्षमता आणि पर्यटकांची मागणी यांचा विचार करूनच ही प्रक्रिया झाली पाहिजे.

कर आणि वीज सवलतींची भूमिका महत्त्वाची...

घरगुती पर्यटनाला प्रोत्साहन देताना त्याला पारंपरिक व्यावसायिक हॉटेलच्या चौकटीत न बसवता स्वतंत्र स्वरूप देण्याची गरज आहे. त्यासाठी वीजदर आणि स्थानिक करांबाबत सवलतीचे धोरण महत्त्वाचे ठरते. कारण छोट्या घरमालकासाठी सुरुवातीची गुंतवणूक हा मोठा अडथळा असू शकतो.

घराची डागडुजी, स्वच्छतागृह, पाणी, फर्निचर, सुरक्षा आणि मूलभूत सुविधा उभारण्यासाठी खर्च करावा लागतो. शासनाकडून योग्य सवलती, मार्गदर्शन आणि परवानगी प्रक्रिया सुलभ झाली तर अनेक घरमालक या क्षेत्रात पुढे येऊ शकतात.

गावाचा विकास झाला तरच पर्यटन टिकेल...

केवळ घर पर्यटकांसाठी खुले करून ग्रामीण पर्यटन यशस्वी होणार नाही. पर्यटकाला गावापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला रस्ता, सुरक्षित वाहतूक, वीज, पाणी, स्वच्छता, इंटरनेट, मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि प्राथमिक आरोग्य सुविधा आवश्यक आहेत. यासाठी ग्रामीण पर्यटन विकासाच्या माध्यमातून पर्यटन गावांमध्ये पोहोच रस्ते, अंतर्गत दिवाबत्ती, स्वागत कक्ष, प्रसाधनगृहे आणि सांस्कृतिक मंच यांसारख्या सुविधा उभारण्याची संकल्पना महत्त्वाची ठरते.

याचा फायदा केवळ पर्यटकांना होणार नाही. या सुविधा स्थानिक ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमानातही सुधारणा घडवतील. त्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली होणारा पायाभूत सुविधांचा विकास हा प्रत्यक्षात गावाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग ठरू शकतो.

कनेक्टिव्हिटी वाढली तर पर्यटनाला वेग

कोकणातील पर्यटनाच्या विकासातील एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे कनेक्टिव्हिटी. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधून पर्यटकांना कमी वेळेत आणि सुरक्षितपणे गावांपर्यंत पोहोचता आले, तर ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. महाराष्ट्राच्या पर्यटन धोरणासोबतच किनारपट्टीवरील वाहतूक आणि संपर्क व्यवस्था सुधारल्यास कोकणातील दुर्गम गावांनाही पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळू शकते.

प्रस्तावित अथवा विकसित होत असलेल्या सागरी महामार्गासारख्या पायाभूत सुविधा या दृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकतात.आजपर्यंत काही निवडक समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांपुरते मर्यादित राहिलेले पर्यटन गावागावांत पोहोचवण्याची संधी या कनेक्टिव्हिटीमुळे निर्माण होऊ शकते.

पर्यटनासोबत कोकणी संस्कृतीचे जतन...

ग्रामीण पर्यटनाचा सर्वांत मोठा सामाजिक फायदा म्हणजे स्थानिक संस्कृतीचे संवर्धन. शहरातील आधुनिक हॉटेलमध्ये पर्यटकाला सुविधा मिळतात; मात्र गावातील घरात राहिल्यावर त्याला त्या प्रदेशाचे जीवन जवळून अनुभवता येते.स्थानिक बोली, खाद्यसंस्कृती, लोककला, पारंपरिक सण, शेतीपद्धती, मासेमारी, हस्तकला आणि ग्रामीण जीवनशैली पर्यटकांसमोर आणता येते. त्यामुळे पर्यटन हे केवळ आर्थिक व्यवहार न राहता सांस्कृतिक देवाणघेवाणीचे माध्यम बनू शकते.

‘बंद घरां’पासून ‘जिवंत गावां’पर्यंतचा प्रवास....

कोकणातील बंद घरे ही केवळ स्थलांतराची समस्या नाहीत; त्यांच्यात मोठी आर्थिक क्षमता दडलेली आहे. योग्य धोरण, पायाभूत सुविधा आणि स्थानिक सहभाग मिळाला तर या घरांचे रूपांतर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या केंद्रांमध्ये होऊ शकते. यातून चाकरमान्यांच्या मालमत्तेची देखभाल होईल, घरमालकांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल, स्थानिक तरुणांना गाव सोडण्याची गरज कमी होईल, महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि पर्यटकांना कोकणचा अस्सल अनुभव मिळेल.

म्हणूनच ‘होम स्टे’ ही केवळ पर्यटकांच्या मुक्कामाची योजना म्हणून पाहण्यापेक्षा कोकणातील स्थलांतराला उत्तर देणारी, बंद घरांना आर्थिक उपयोगात आणणारी आणि गावांच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारी संकल्पना म्हणून पाहण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT