कोकणचा मत्स्य व्यवसाय हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हजारो लोकांच्या उपजीविकेचे साधन असणारा व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसाय, विक्री, निर्यात, हॉटेल व्यवसाय यांचा विचार करता या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसायाचे हे व्यापक स्वरूप व त्याचे महत्त्व लक्षात घेता या व्यवसायाच्या वाढीसाठी नवे विचार आयामांची आवश्यकता आहे. कोकणच्या किनारपट्टीवर मत्स्य व्यवसायाला फार मोठा वाव आहे. सहा लाख टन उत्पादनाची क्षमता असणाऱ्या राज्याच्या किनारपट्टीवर सध्या केवळ साडेचार लाख टन उत्पादन घेतले जाते. हे उत्पादन वाढवण्यासाठी मच्छीमारांनी पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देण्याची आवश्यकता आहे.
विश्वनाथ कुडू
लहान-मोठ्या दऱ्या, समुद्राला जोडणाऱ्या खाड्या, समुद्रकिनारा यामुळे मत्स्यव्यवसाय हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. मत्स्यव्यवसायाचे प्रामुख्याने तीन विभाग पडतात. सागरी मत्स्य -व्यवसाय, निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय आणि भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय. मासेमारीबरोबर मत्स्यसंवर्धन ही संकल्पना अलीकडे दृढ होत चालली आहे. कोकणात सागरी मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यात तळी तलावांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने या जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करण्यात येतो. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाडीलगतचे खाजण जमीन क्षेत्र कोळंबी संवर्धनासाठी उपयोगात आणण्यात येते. कोकण किनाऱ्यावर 1966-67 पासून नौकाच्या यांत्रिकीकरणास सुरुवात झाली. कोकण किनाऱ्यावर समुद्र आणि खाड्यांलगतची सुमारे 450 मच्छीमार गावे या व्यवसायात आहेत. सोनकोळी, महादेव कोळी, खारवी, गाबीत, भोई व दालदी या व्यवसायात आढळतात. सध्या साडेचार लाख टन एवढेच मत्स्य उत्पादन केले जात आहे तसेच सध्या 50 मीटरपर्यंत जी मच्छीमारी केली जाते ती 100 मीटरपर्यंत केली जाऊ शकते. राज्यातील मच्छीमार खोल समुद्रात मच्छीमारीस जात नाहीत. बहुसंख्य मच्छीमार हे जवळच्या समुद्रातच मासेमारी करतात.
मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी समुद्रात खोलवर जाणे आवश्यक असते आणि त्यासाठी त्यांच्या यांत्रिकी बोटींची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. पण, अजूनही पारंपरिक नाव आणि बोटींवरच मच्छीमारांचा भर आहे. मत्स्य- उत्पादन वाढीसाठी मच्छीमारांची दृष्टीच बदलण्याची गरज आहे. मत्स्योत्पादनातील वाढीसाठी अलीकडे समुद्रातील पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धनावर भर देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील सुमारे 38 हजार 771 चौ. मी. क्षेत्रात या पद्धतीने मत्स्य संवर्धन करणे शक्य आहे.
प्रारंभी यापैकी केवळ 10 टक्के क्षेत्राचा वापर केल्यास 2 लाख 70 हजार टन अधिक उत्पादन मिळू शकेल. गेल्या दोन वर्षात पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रातील मत्स्योत्पादन अनेक कारणांनी झपाट्याने कमी होत आहे. खोल समुद्रातील मासेमारी, उथळ पाण्यातील मासेमारी व खाडीतील मासेमारी अशा तीन पद्धतीने मासेमारी चालते. मच्छीमारांसाठी डिझेल तेलावरील मूल्यावर्धित कराची प्रतिपूर्ती योजना, मच्छीमारांना अपघात गट विमा योजना, मासेमारी करताना अपघाती मृत्यू झाल्यास मच्छीमारांच्या वारसांना अर्थसहाय्य, मच्छीमार युवकांना प्रशिक्षण, मत्स्यबीज केंद्राची स्थापना, अवरुद्ध पाण्यात मत्स्यसंवर्धन, मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य, बिगर यांत्रिक नौकांना बाह्य व आंतर इंजिन बसविण्यासाठी अर्थसहाय्य या कल्याणकारी योजना शासनामार्फत राबविल्या जातात.
राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागाकडे जणगणनेच्या नोंदीनुसार भूजल, सागरी, निमखारे पाणी इ. क्षेत्रात 18 ते 65 वयोगटातील क्रियाशील मच्छीमारांना अपघात व अपंगत्व यासाठी अपघात गट विमा योजना लागू केली आहे. मच्छीमार मासेमारी करीत असताना मृत्यू अथवा पूर्णत: कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रु. विमा संरक्षण व अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख रु. चे विमा संरक्षण देण्यात येते. मच्छीमारांनी विमा हप्त्यापोटी रक्कम भरण्याची आवश्यकता असणार नाही. नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छीमारी तंत्राचा अवलंब करून मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छीमार युवकांना सर्वांगीण प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई, वर्सोवा, अलिबाग, रत्नागिरी व मालवण येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रात सागरी मत्स्य व्यवसाय नौकानयन, सागरी मासेमारी पद्धती, नौका इंजिनाची देखभाल व परीरक्षण आदीचे प्रशिक्षण देण्यात येते.
वाढते शहरीकरण, तिवरांच्या बेटांचा झपाट्याने होणारा नाश, माशांच्या प्रजोत्पादन काळातील मासेमारी, पाणी प्रदूषण, गाळाच्या समस्या, बड्या कंपन्यांच्या ट्रॉलर्सकडून मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी यामुळे मत्स्योत्पादन घटले आहे. याकडे सर्वच संबंधित घटकांचे दुर्लक्ष होत आहे. पाण्ाी प्रदूषणामुळेही माशांचा व माशांच्या अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत आहे. रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या पाण्यामुळे किनाऱ्यालगतच्या समुद्रातील हजारो मासे मरून किनाऱ्याला लागल्याचे अनेकदा अनुभवाला आले आहे.
जगभरात सी फूडचीही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामध्ये त्वरित खाद्याचे व साठवणुकीचे प्रकार असे दोन भाग करण्यात येतात. त्वरित खाद्यप्रकारात मत्स्य कट वडे, वडा, मत्स्य भजी, कोळंबी पकोडा आदी पदार्थ बनवले जातात. साठवणुकीच्या प्रकारात कोळंबी लोणचे, कोलीम चटणी, कालवाचे लोणचे आदी पदार्थ बनविले जातात. आधुनिक तंत्रज्ञान वापरून ताजी मासळी पॅक अथवा हवाबंद डब्यात भरून ठेवता येते व आपल्या सोयीनुसार वापरता येते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका असणारे मत्स्य व्यवसाय क्षेत्र राज्याला कोट्यवधीचे परकीय चलन मिळवून देते.
मत्स्यव्यवसाय क्षेत्र रोजगार निर्मितीला पूरक आहे. उपलब्ध मत्स्य साठ्याचे योग्य व्यवस्थापन करून मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. मच्छीमारांच्या समस्यांपैकी माशांचे घटते उत्पादन ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे माशांचे उत्पादन कसे वाढेल, याकडे सर्व संबंधित घटकांनी त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. कोकणच्या विकसनशील अर्थव्यवस्थेचा आधार आहे.