कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सराईत चोरट्याला जेरबंद करून त्यांच्याकडून 10 दुचाक्या जप्त केल्या. pudhari photo
ठाणे

Thane Crime : सराईत दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

3.55 लाखांच्या 10 दुचाक्या हस्तगत, 8 गुन्ह्यांची उकल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : रस्त्याच्या कडेला, इमारतींच्या आवारात, सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाक्यांच्या चोऱ्यांमुळे मालकांसह पोलिसही सैरभैर झाले होते. अखेर कोळसेवाडी पोलिसांच्या खास पथकाने मोठ्या महत्प्रयासाने उल्हासनगरच्या पठ्ठ्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या जोडगोळीकडून आतापर्यंत केलेल्या 8 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून 3 लाख 55 हजार रूपये किंमतीच्या 10 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

शुभम उर्फ शिवम संपत पठारे (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर 3 येथील पंजाबी कॉलनीमध्ये असलेल्या गुरूद्वाराजवळच्या एका चाळीत राहणारा आहे. तर त्याचा साथीदार देखील उल्हासनगर परिसरात राहणारा असून त्याची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यातून दुचाक्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण घेटे यांनी चोऱ्यांचा छडा लावण्याचे फर्मान सोडल्यानंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गुरव आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

शुक्रवारी 3 एप्रिल रोजी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर असलेल्या रॉयल रेसिडेन्सीजवळ दोन इसम संशयीतरित्या तेथे पार्क केलेल्या दुचाक्यांची पाहणी करत असल्याची माहिती या पथकातील पोलिस शिपाई सुरेंद्र इंगळे यांना खासगी गुप्तहेरांकडून मिळाली. पोलिसांनी फिल्डिंग लावून त्या दोघांना तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

सुरूवातीला या जोडगोळीकडून कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून लांबविलेली स्कूटर हस्तगत करण्यात आली. गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या सपोनि संदिप भालेराव, पोउपनि जगन सापटे, हवालदार कापडी, बोरसे, सांगळे, सौंदाणे, सांगळे, वाघ, घुगे, आव्हाड, जाधव, बुधवंत, फटांगरे, कोती, यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT