शहापूर : राजेश जागरे
शहापूर उपवनसंरक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या धसई वनपरिक्षेत्रातील किन्हवली येथील चिखलगाव रोपवाटिकेच्या परिसरात वन वणव्याची भीषण घटना घडून सुमारे शेकडो हेक्टर राखीव वनक्षेत्र जळून खाक झाले आहे.
या आगीत अनेक दुर्मिळ पशू-पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला असून वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे.वनविभागाचे अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वणव्यांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे.
धसई वनपरिक्षेत्रात तब्बल 12 हजार 500 हेक्टर राखीव वनक्षेत्र असून किन्हवली-सरळगाव रस्त्यालगत असलेल्या वनविभागाच्या राखीव जंगलात फेब्रुवारी महिन्यापासून वारंवार वणवे लागत आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागलेल्या वणव्यातून काही प्रमाणात जंगल वाचवण्यात आले होते.
मात्र त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा भीषण आग लागली.उरलेल्या वनक्षेत्रालाही रविवारी सायंकाळच्या सुमारास लागलेल्या वणव्याने ते बेचिराख करून टाकले.वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी एका महिलेने वणवा विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र तो निष्फळ ठरला.
वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे वृक्ष संगोपनासाठी शासनाकडून दिलेला लाखो रुपयांचा निधी आगीत भस्मसात झाला आहे. परिणामी वन्यजीवांचे अधिवास नष्ट होऊन पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
वणवे रोखण्यात अडचणी...
चिखलगाव नर्सरीत मागील दोन वर्षांपासून रोपे तयार करण्यास शासनाची परवानगी नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. किन्हवली विभागात वनपालासह अवघे तीन कर्मचारी असल्याने त्यांना वणवे रोखणे कठीण जात आहे. पूर्वी नर्सरीतील हंगामी कामगारांची मदत मिळत होती. मात्र त्यांचीही संख्या कमी करण्यात आल्याने वणवे रोखण्यात अडचणी वाढल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.