

खानिवडे : गेल्या काही दिवसांपासून वसईत उन्हाचा पारा वाढत असून,नागरिकांसह वसईतील वनपरिसरालाही याची झळ सोसावी लागत आहे.वाढती उष्णता, तसेच जाणीवपुर्वक लावलेल्या आगींमुळे जंगल परिसरात वणव्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.हे वनवे रोखण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र दुसरीकडे वणव्यांच्या घटनांमध्ये वाढत होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वनवे रोखण्यासाठी अधिक ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.
वसई तालुक्यातील सागरी व नागरी वस्तीच्या पुढे असलेल्या डोंगरी भागात वणव्यांचा प्रकोप भर दिवसाही दिसून येत आहे. तालुक्यातील महामार्ग ते विरार रस्त्यावरील पिरकुंडा जंगल,कुंभारपाडा तलाव जंगल, खानिवडे येथील जंगल,टकमक गडाच्या खालील जंगल, माडकेपाडा जवळील जंगल हे आगीच्या ज्वालांनी वेढलेले दिसून येत असून, तसेच काही प्रमाणात अभयारण्यात देखील धुराडा दिसून येत असल्याने तापलेल्या वसईला चारी बाजूंनी वणव्यांचा भडका उडाला आहे.
हे वणवे मांडवी वनपरिक्षेत्र, भाताणे वनपरिक्षेत्र, शिरसाड वन विकास महामंडळ तसेच अभयारण्य वनाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली आहेत. हे वणवे विझवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करतो असे वरील वन विभागाच्या कार्यालयातून सांगण्यात येत असले तरी आजवर एकही वनांना आग लावणारा सापडला नाही, किंवा वणवे भडकवणाऱ्यावर कोणतीही कारवाई झाल्याचे उदाहरण समोर येत नसल्यामुळे वन विभाग व वन विकास महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान डहाणू वन विभागाने उन्हाळ्यात वाढत चाललेल्या तापमानामुळे जंगलातील वणव्याच्या घटनांचा धोका वाढला असून मौल्यवान वनसंपदा, वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी आणि वसई या चार तालुक्यांचा समावेश असलेल्या डहाणू वनविभागाचे एकूण वनक्षेत्र तब्बल 918.66 चौ. कि.मी. इतके आहे.
पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर तीनही बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या विभागाला उत्तरेस गुजरात राज्य व दादरा-नगर हवेली-दमन-दीव केंद्रशासित प्रदेश, पूर्वेस जव्हार वनविभाग आणि दक्षिणेस ठाणे वनविभागाची सीमा आहे. या विभागात 12 वनक्षेत्रे, 58 परिमंडळे आणि 165 नियतक्षेत्रे कार्यरत आहेत. सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे आणि कोरड्या हवामानामुळे जंगलात नैसर्गिक कारणांमुळे किंवा मानवी दुर्लक्षामुळे वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
आकडेवारी काय सांगते
वन विभागाच्या आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये 180 वणव्यांच्या घटनांमुळे 386.565 हेक्टर क्षेत्र बाधित झाले, तर 2025-26 मध्ये (फेब्रुवारी अखेरपर्यंत) 42 घटना नोंदवून 70.779 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. दिवसासोबतच रात्रीच्या वेळीही वन कर्मचारी नियमित गस्त घालून वणव्याच्या घटनांवर लक्ष ठेवत आहेत.
वनक्षेत्रात जाणीवपूर्वक आग लावणाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 व 33 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.मात्र आजवर एकालाही वनविभागाला पकडता आले नाही.
नागरिकांना आवाहन
जंगल परिसरात पेटती काडी, सिगारेट किंवा अन्य ज्वलनशील वस्तू टाकू नयेत. वनक्षेत्रात कुठेही आग लागल्याचे आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे.