सापाड : योगेश गोडे
कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांना निरोगी जीवनशैलीकडे वळवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मोफत व्यायामाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून गेल्या काही वर्षात शहरातील विविध उद्याने, मोकळ्या जागा आणि तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात ओपन जिम उभारण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही सुरुवातीला या सुविधांचे स्वागत केले. सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी, चालण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी अनेक नागरिक या ओपन जिममध्ये गर्दी करू लागले होते.
मात्र कालांतराने देखभाल आणि दुरुस्तीअभावी शहरातील बहुतांश ओपन जिमची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अनेक ठिकाणी उपकरणे तुटलेली, गंजलेली आणि नादुरुस्त अवस्थेत पडलेली दिसून येत आहेत. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पांकडे नागरिकांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या खुल्या व्यायामशाळांची सध्याची अवस्था पाहता "उभारणीवर भर, पण देखभालीकडे दुर्लक्ष" अशी टीका आता पालिका प्रशासनावर होत आहे.
आरोग्यदायी उपक्रमाची सुरुवात; पण देखभालीअभावी अपयश शहरातील सर्वसामान्य नागरिकांना महागड्या खासगी जिमचा पर्याय उपलब्ध व्हावा, महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने नियमित व्यायाम करावा आणि नागरिकांचे आरोग्य सुधारावे या उद्देशाने महापालिकेने ओपन जिमची संकल्पना राबवली होती. विविध उद्यानांमध्ये सायकलिंग मशीन, एअर वॉकर, रोईंग मशीन, चेस्ट प्रेस, ट्रिस्टर, पुल-अप बार यांसारखी आधुनिक व्यायाम साधने बसवण्यात आली असून सुरुवातीच्या काळात या ओपन जिममध्ये सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत होती.
महिलाही या सुविधेकडे आकर्षित झाल्या होत्या. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी चालण्यासोबत हलका व्यायाम सुरू केला होता. तरुणाईही फिटनेसकडे वळताना दिसत होती. मात्र काही महिन्यांतच अनेक उपकरणे तुटू लागली. काही ठिकाणी मशीनचे बोल्ट निखळले, तर काही ठिकाणी लोखंडी भाग गंजले. अनेक व्यायाम उपकरणांवर रंग उडाला असून काही ठिकाणी साहित्य पूर्णपणे निकामी झाले आहेत. देखभाल आणि नियमित तपासणीचा अभाव यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी तलावाजवळील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेली ओपन जिम सध्या दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथे बसवण्यात आलेली अनेक उपकरणे नादुरुस्त झाली असून काही ठिकाणी लोखंडी भाग तुटलेले आहेत. तरीही मॉर्निंग वॉकसाठी येणारे काही नागरिक उपलब्ध असलेल्या उपकरणांचा वापर करताना दिसतात. अनेकांना दुखापत होण्याची भीती आहे.
उपकरणे तुटल्याने अनेकांना दुखापत
सुरुवातीला या जिमचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. परंतु उपकरणे तुटल्यानंतर आणि दुरुस्ती न झाल्याने नागरिकांनी हळूहळू या जिमपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. अनेकदा पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र काही दिवस तात्पुरती दुरुस्ती करून पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे कायमस्वरूपी देखभाल यंत्रणा नसल्याचे दिसून येत आहे. पूर्वी शहरातील प्रत्येक मैदानात डबलबार असायचे. सकाळी आणि सायंकाळी तरुणाई तेथे व्यायामासाठी जमत असे.