कल्याण : केडीएमसीच्या पहिल्याच महासभेत स्थायी, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये शिवसेना शिंदे गट, मनसे व एनसीपी शरद पवार गट एकत्रित शिव आघाडीच्या घटक पक्षातील शिवसेना शिंदे गटाने मनसेला सत्तेचा वाटा देत पालिकेच्या महत्वाच्या स्थायी समिती, महिला बालकल्याण समिती व शिक्षण समिती मध्ये प्रत्येकी एका सदस्याला प्रतिनिधीत्व दिले आहे. मनसेने शिवसेना शिंदे गटाला महापौर पदासाठी दिलेल्या पाठिंबाच्या बदल्यात त्यांना ही बक्षिशी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली होती.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नवनियुक्त नगरसेवकांची पहिली महासभा असल्याने सर्वच नवनियुक्त नगरसेवक सभेला उपस्थित राहिले होते. स्थायी समिती मध्ये 16 सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये शिवसेना, मनसे, शिव आघाडी गटा कडून गजानन पाटील, महेश गायकवाड, जयंवत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विजया पोटे आणि मनसेचे गणेश लांडगे, भाजपचे दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनिषा गायकवाड, मुकुंद पेंडणेकर, नंदू म्हात्रे, उपेक्षा भोईर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विशाल गारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला बाल कल्याण समितीमध्ये 11 सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये शिवसेना मनसे शिव आघाडीचे रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, अस्मिता मोरे, सारिका जाधव, मनसेकडून रसिका पाटील, भाजपा कडून मेघाली खेमा, पूजा गायकवाड, सरोज राय, सुनिता पाटील, रविना माळी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तेजस्विनी गायकवाड यांचा समावेश आहे.
शिक्षण समिती सदस्य पदी 11 सदस्यांची निवड करण्यात आहे. शिवसेना मनसे शिव आघाडीचे प्रतिक पेणकर, अनघा देवळेकर, शालीनी वायले, दीपाली पाटील, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, भाजपकडून अभिजीत थरवळ, जतीन प्रजापती, कविता म्हात्रे, श्यामल गायकर, रसिका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे अर्पणा भोईर यांचा समावेश आहे. अशा एकूण सर्वच पक्षाचे 38 नगरसेवकांची पालिकेच्या तीन महत्वाच्या समित्या मध्ये वर्णी लागली आहे. स्थायी समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि शिक्षण समित्या मध्ये सदस्य पदाच्या नियुक्त्या झाल्या नंतर आता पुढील महासभेत या तिन्ही समित्यांच्या सभापती पदाची निवड होणार असून सभापती निवडीसाठी चांगलीच रस्सीखेच होणार आहे.