केडीएमसीमध्ये अखेर शिंदे गट भाजपाचे जुळले pudhari photo
ठाणे

KDMC committee chairman election : केडीएमसीमध्ये अखेर शिंदे गट भाजपाचे जुळले

स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समिती सभापतीपद शिंदे सेनेकडे; भाजपाला शिक्षण समिती सभापतीपद

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या तिन्ही महत्वाच्या समित्याच्या सभापती पदासाठी शिवसेना शिंदे गट व भाजपाचे अखेर सूत जुळल्याने निवडणुकीच्या लढतीतील चुरस संपुष्टात आली. पालिकेच्या अर्थिक तिजोरीची चावी असलेली स्थायी समिती सभापती पदा सह महिला व बालकल्याण समिती सभापती पद शिवसेना शिंदे गटाने काबीज केले. तर शिक्षण समिती सभापती पद भाजपाच्या वाट्याला आले.

शिंदे गटाचे मल्लेश शेट्टी यांची स्थायी समिती सभापती पदी तर महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी सारिका जाधव यांची तर शिक्षण समिती सभापती पदी भाजपाचे अभिजित थरवळ यांची बिनविरोध निवड झाली असून सोमवारी केवळ औपचारिक घोषणा होण्याची बाकी आहे.

महापालिकेची निवडणूक पार पडल्यावर महापौरपदी शिंदे सेनेच्या हर्षाली चौधरी या विराजमान झाल्या. उपमहापौरपदी राहूल दामले हे विराजमान झाले. महापौरपद शिंदे सेनेला आणि उपमहापौरपद भाजपला मिळाले. महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकरीता असल्याने शिंदे सेनेकडे उमेदवार होता. तर भाजपकडे या प्रवर्गातील उमेदवार नव्हता. त्यानंतर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती असतील याकडे सगळयांचे लक्ष होते. स्थायी समिती सभापती पदावर भाजपने दावा ठोकला होता.

पालिकेच्या महत्वाच्या समित्या असलेल्या स्थायी समिती सभापती, महिला व बाल कल्याण समिती सभापती आणि शिक्षण समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना शिंदे गट व भाजपा महायुती पक्षाने सामोपचाराने शिवसेना शिंदे गटाला स्थायी समिती व महिला व बाल कल्याण समिती सभापती पद तर भाजपाला शिक्षण समिती सभापती पद देण्याचा निर्णय घेतल्याने अखेरीस भाजपला शिक्षण समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले आहे.

शिक्षण समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ तर स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे मल्लेश शेट्टी यांनी व महिला बाल कल्याण समिती सभापती पदी पदासाठी शिंदे सेनेच्या सारीका जाधव यांनी उमेदवारी अर्ज पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केला आहे. त्यामुळे शिंदे सेनेच्या हाती महत्वाची असलेली स्थायी समिती आणि महिला बाल कल्याण समिती आली आहे.

प्रत्येक समितीसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज सचिव किशोर शेळके यांच्याकडे प्राप्त झाल्याने तिन्ही समितीच्या सभापती पदाची निवड बिनविरोध होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा येत्या सोमवारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली थवील, उपमहापौर राहूल दामले, शिंदे सेनेचे गटनेते विश्वनाथ राणे, भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मल्लेश शेट्टी तिसऱ्यांदा स्थायी समिती सभापतीपदी विराजमान होणार

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी यापूर्वीही दोन वेळा स्थायी समिती सभापती पद भूषविले आहे. त्यांना शिंदे सेनेने पुन्हा संधी दिली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला पक्षाने पूर्ण विराम दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT