Satara News : खटावचा प्रगल्भ राजकीय वारसा झाला आणखी समृद्ध

डॉ. प्रिया शिंदेंची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड होताच गावकऱ्यांचा जल्लोष
Satara News
Satara News
Published on
Updated on

खटाव : कोरेगाव-खटाव मतदारसंघाचे आमदार आणि कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रियाताई शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड होण्याने खटावचा प्रगल्भ राजकीय वारसा आणखी समृद्ध झाला आहे. प्रियाताई जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदी त्यांच्या झालेल्या निवडीने खटावचे राजकीय महत्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडींनी गाजली. भाजपने राजकीय पटलावर वापरले जाणारे सर्व फंडे वापरुन प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता स्थापन केली. अत्यंत नियोजनबद्ध चाली खेळून भाजपने जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवले. भाजपने अध्यक्षपदासाठी डॉ. प्रिया शिंदेंचे ट्रम्प कार्ड काढणे हीच सर्वात मोठी आणि एकवटलेल्या सेना-राष्ट्रवादीला चेकमेट देणारी चाल ठरली. बहुमताला कमी पडणारे संख्याबळ जुळवण्यापासून ते इतर इच्छुकांना नाराज न करण्यापर्यंतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रियाताई शिंदेंच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीने देण्यात आली. अर्थात त्यात आ. महेश शिंदेंनी मोठी जोखीम पत्करुन दाखवलेल्या मुत्सद्देगिरीचाही मोठा वाटा आहे. प्रियाताई शिंदेंची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे समजताच खटावमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सातारा, कोरेगाव, पुसेगाव येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्री उशीरा त्यांचे खटावमध्ये आगमन होताच गावकरी आनंदाने बेभान झाले होते. मोठ्या संख्येने महिला भगिनींकडून त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. डिजेच्या तालावर ठेका धरलेल्या खटावकर महिला कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांनी प्रियाताई शिंदेंना खांद्यावर उचलून घेऊन मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणुकीवर गुलालाची उधळण करण्यात आली.

खटावला सहकारमहर्षी माजी आ. स्व. केशवराव पाटील, माजी आ. स्व. चंद्रहार पाटील यांची मोठी राजकीय परंपरा आहे. चंद्रहार पाटील पंचायत समितीचे सभापतीही होते. त्यांच्यानंतर आता आ. महेश शिंदे सलग दुसऱ्यांदा विधानसभा सदस्य म्हणून खटावचा नावलौकिक वाढवत आहेत. त्यांनी कॅबिनेट दर्जाचे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपदही भूषवले आहे. जिल्हा बँकेचे संचालक असलेल्या प्रदीप विधातेंनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. आता थेट मिनी मंत्रालय असलेल्या सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी डॉ. प्रियाताई शिंदे यांना मिळाली आहे. त्या आ. महेश शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून गेली अनेक वर्षे राजकारण, समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांचे महिला संघटन थक्क करणारे आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत त्या राजकारण, समाजकारणात खूप मुरब्बी असल्याचे दिसून आले होते. नुकतेच त्यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. आता त्या जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत. प्रियाताई शिंदेंकडे असलेले अष्टपैलू नेतृत्वगुण पाहता सातारा जिल्ह्याच्या लौकिकाला साजेसा उठावदार कारभार त्यांच्याकडून होईल यात शंकाच नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news