Kalyan Dombivli Municipal Corporation Hawkers Action
डोंबिवली : केडीएमसीच्या कारवाईपासून दूर राहण्यासाठी फेरीवाल्यांनी शक्कल लढविली आहे. डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या रेल्वे परिसरातील रेल्वेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहासह त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या उघड्यावर असलेल्या मुतारीचा चक्क फळे-भाजीपाल्याच्या गोदामासाठी वापर सुरू केला आहे. केडीएमसीच्या फ आणि ग या दोन्ही प्रभागांकडून १५० मीटर अंतरात असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईची जोरदार मोहीम उघडली आहे. त्यामुळे चोरून लपून रेल्वे स्टेशन परिसरात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनी त्यांच्याकडील भाजीपाला, काजू, फणस, सफरचंद, द्राक्षे आणि इतर वस्तू लपवून ठेवण्यासाठी चक्क सार्वजनिक मुतारीचा आधार घेतला आहे.
केडीएमसीचे पथक निघून गेल्यानंतर हेच फेरीवाले आपला माल मुतारीतून काढून पुन्हा रस्त्यावर आणून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुतारी सारख्या गलिच्छ जागेत ठेवलेला भाजीपाला आणि फळे रस्त्यावर आणून ते डोंबिवलीकरांना विकत असल्याने अशा फेरीवाल्याकडून कोणताही माल विकत घेऊ नये, असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात येत आहे.
डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या १५० मिटर परिघातील परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशांची पायमल्ली करणारा कुणीही असला तरी त्याच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याकडे माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी पोलिसांसह शासन/प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यानुसार एकीकडे स्टेशन परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर केडीएमसीने कारवाईची आक्रमक मोहीम उघडली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी पुढाकार घेऊन उन्मत्त फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथसह रस्ते बळकावून व्यवसाय करणारे बहुतांशी फेरीवाले हे मुंब्रा, मस्जिद बंदर, भायखळा, अंधेरी परिसरातील असून त्यातील अनेक फेरीवाले परप्रांतीय आहेत. हे फेरीवाले ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करताना दिसत नाहीत. भाजीपाला आणि फळांच्या विक्रीतून बक्कळ पैसा मिळण्याच्या हेतूने या फेरीवाल्यांनी त्यांच्याकडील माल लपविण्यासाठी चक्क मुतारीचा वापर सुरू केला आहे.
पूर्वेकडे रेल्वे स्टेशन परिसर फ आणि ग प्रभाग क्षेत्रात येतो. गेल्या महिन्यांपासून फेरीवाला हटाव नियंत्रण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाला मुक्त करण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. या कारवाईच्यावेळी आपले भाजीपाला, फळे आणि इतर सामान जप्त होऊ नये म्हणून अनेक फेरीवाले रेल्वे स्टेशन हद्दीतील सार्वजनिक स्वच्छतागृह आणि त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मुतारीच्या जागेत आपले भाजीपाला, फळे आणि इतर वस्तू लपून ठेवतात. केडीएमसीच्या पथकाची पाठ फिरवल्यानंतर रात्रीच्या सुमारास किंवा वेळ मिळेल तेव्हा आपले लपविलेले सामान पुन्हा रस्ते आणि पदपथावर आणून विक्री करतात.
भाजीपाला आणि फळे ताजी असल्याचे दाखविण्यासाठी फेरीवाले त्यावर पाणी मारतात. रेल्वे प्रवासातून दमून आलेल्या गृहिणी याच भाज्या आणि फळे ताज्या असल्याचे पाहून विकत घेत असतात. मात्र हा भाजीपाला आणि फळे मुतारीच्या जागेत लपवून ठेवल्याचे ग्राहकांच्या लक्षात येत नाही. विशेष म्हणजे फळे आणि भाज्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृह आणि मुतारीतील पाण्याचा वापर केला जात असल्याने प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
मंगळवार ते बुधवार दरम्यान ग आणि फ प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकांनी रेल्वेच्या हद्दीतील स्वच्छतागृहासह त्याच्या पाठीमागील बाजूला असलेल्या उघड्यावरील मुतारीच्या जागेत ठेवलेल्या भाजीपाला, फळ आणि इतर सामानांवर जप्तीची कारवाई केली. रात्रीच्या सुमारास याच स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस अनेक नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. हा सारा प्रकार केडीएमसीच्या पथकाने व्हिडिओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला आहे. या पथकाने फणस, चिकू, सफरचंद, संत्री, मोसंबी, द्राक्षे, भाजीपाला उघड्यावर असलेल्या मुतारीच्या जागेतून जप्त केला. नागरिकांनी आपल्या आरोग्याचा विचार करून मंडईतून भाजीपाला आणि फळे खरेदी करावीत असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे.