Human Trafficking Pudhari
ठाणे

Human Trafficking: व्हॉट्सॲपवर मुलींचे फोटो पाठवून देहव्यापार

महिला दलाल रंगेहात जेरबंद; दोन पीडितांची सुटका

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: आर्केस्ट्रा डान्स बार आणि डान्स क्लबमध्ये काम करणाऱ्या तरुणींचे फोटो व्हॉट्सॲपवर ग्राहकांना पाठवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेणाऱ्या महिला दलालाचा काशीगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

मेराकी हॉटेल परिसरात सापळा रचून पोलिसांनी ३० वर्षीय महिला दलालाला रंगेहात अटक केली असून, तिच्या तावडीतून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांना एका संस्थेमार्फत माहिती मिळाली होती की, काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-गुजरात महामार्गावरील घोडबंदर रोडवरील मेराकी हॉटेल येथे एक महिला दलाल ग्राहकांना व्हॉट्सॲपवर मुलींचे फोटो पाठवून देहव्यापारासाठी मुली पुरविणार आहे.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदिनी वारे, अन्वर शेख आणि त्यांच्या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला.

ठरलेल्या ठिकाणी महिला दलाल दोन पीडित मुलींना घेऊन आली. पैशांची देवाणघेवाण होताच पोलिसांनी छापा टाकून मंजुदेवी जितेंद्र नट (वय ३०, रा. शांती पार्क, मीरा रोड) हिला रंगेहात ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, ही महिला गेल्या एक वर्षापासून आर्केस्ट्रा डान्स बार आणि डान्स क्लबमध्ये काम करणाऱ्या मुलींचे फोटो व्हॉट्सॲपवर ग्राहकांना पाठवून देहव्यापारासाठी त्यांना पुरवत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेल्या दोन्ही पीडित तरुणींना सुरक्षिततेसाठी कांदिवली येथील रेस्क्यू फाउंडेशनच्या संरक्षणगृहात पाठविण्यात आले असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास काशीगाव पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT