Crime News pudhari photo
ठाणे

Thane Crime : बनावट बँक खाती उघडून ऑनलाईन फ्रॉड करणारी मोठी टोळी गजाआड

काशिगाव पोलिसांची मोठी कारवाई; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : इसमांची टेलिग्रामवर ओळख करून बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडून, त्या खात्यांचा वापर ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसाठी (सायबर फ्रॉड) करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा काशिगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल १६ महागडे मोबाईल आणि १ लॅपटॉप असा एकूण ४ लाख ९७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काशिगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित लांडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, २४ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद हायवेवरील काशिमीरा येथील हॉटेल स्वागत जवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी २५ जून रोजी पहाटे आरोपींना अटक केली. सुब्रतो मुखर्जी (मिरा रोड), सुदीप मुखर्जी (मिरा रोड), राजाराम पाटील (नालासोपारा पूर्व), सुभाष वांदरे (नालासोपारा पूर्व), अमर कांबळे (विरार पूर्व), सिद्धार्थ सरकार (पश्चिम बंगाल), नियम शेट्टी (मिरा रोड), सलमान (रा. मिरा रोड ) गुन्ह्यात या आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही टोळी संगणमत करून सर्वसामान्यांची व शासनाची दिशाभूल करत होती. टेलिग्रामवर इसमांची ओळख करून त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या नावाने बनावट बँक खाती खोलत होते. नालासोपारा येथील तीन नागरिकांशी संपर्क करून त्यांना काशिमीरा येथे बोलावले. त्यांना स्वागत हॉटेल मध्ये तीन दिवस ठेवले. त्यानंतर बनावट कंपन्या दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती खोलली. त्याद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये खोटे व बनावट बँक खाते तयार केले होते.

या बनावट खात्यांचा वापर करून ते ऑनलाईन सायबर फ्रॉडचे पैसे वळवत असत व स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना पकडले आहे. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या गुन्ह्यांत वापरलेले व फसवणुकीच्या पैशातून घेतलेले १६ महागडे मोबाईल, लॅपटॉप व डिजिटल साहित्य, इंडसइंड बँकेचे वेलकम लेटर, पासबुक आणि राधे फॅशन व शिवशक्ती इलेक्ट्रॉनिक्स या नावांचे व्यावसायिक बँक खाते दस्तऐवज मिळून आले. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT