

डोंबिवली : स्वतःला मोठा फायनान्सर म्हणून सांगत एका फोनवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याच्या थापा मारणाऱ्या डोंबिवलीतील निखिल भोईर याला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत साथीदार राजा जोशीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाऊन्सर आणि खासगी गनमॅनच्या गराड्यात फिरत पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेऊन मोठा दरारा निर्माण करणाऱ्या या टोळीने बिल्डर, वकील तसेच निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल भोईर हा मोठ्या रकमेच्या कर्जाची गरज असलेल्या व्यावसायिकांना लक्ष्य करत असे. त्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याची शंभर टक्के हमी देत तो आपल्या जाळ्यात ओढायचा. या प्रकरणातील तक्रारदार देवानंद गंगाधर साळसकर (वय ६४, रा. मुलुंड) यांना व्यवसायासाठी १५ कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता होती. निखिलने त्यांना कर्ज मंजुरीचे आमिष दाखवत कर्ज रकमेच्या सव्वा टक्के कमिशनची मागणी केली.
कमिशनपोटी त्याने साळसकर यांच्याकडून तब्बल १६ लाख ६९ हजार रुपये आगाऊ घेतले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने ५ लाख रुपयांचा धनादेश दिला; मात्र काही दिवसांतच तो धनादेश बाऊन्स झाला. त्यानंतर ना कर्ज मिळाले, ना दिलेली रक्कम परत मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळसकर यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी निखिल भोईर आणि राजा जोशी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२) आणि ३१८ (४) अंतर्गत विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.
शुक्रवारी आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस तपासात निखिल भोईर हा नेहमी ४ ते ५ बाऊन्सर आणि शस्त्रधारी गनमॅनसोबत फिरत असल्याचे समोर आले आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेऊन ‘वरपर्यंत माझे लागेबांधे आहेत’ असा आव आणत तो समोरच्या व्यक्तींवर मानसिक दबाव निर्माण करत असे. या खोट्या प्रभावाला भुलून अनेक प्रतिष्ठित आणि सुशिक्षित व्यक्तींनी त्याच्याकडे लाखो रुपये गमावल्याचे उघड झाले आहे.
प्राथमिक तपासात काही नामांकित बिल्डर्स, वकील आणि निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आता आरोपींच्या बँक खात्यांची, त्याच्या कथित संपर्कांची, बाऊन्सर-गनमॅन टोळीची तसेच या रॅकेटमधील इतर साथीदारांची चौकशी करत आहेत. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.