

वाशीम : पेट्रोल पंपावर डिझेल भरून 'चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया'च्या नकली नोटा खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा मालेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या नकली नोटांसह एका इनोव्हा कार आणि ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही धडक कारवाई ता २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास अमानी येथील विकास गवळी यांच्या पेट्रोल पंपावर करण्यात आली.
ता २९ मे रोजी सायंकाळी 7.00 वाजेच्या सुमारास अमानी येथील विकास गवळी यांच्या पेट्रोल पंपावर एक 'इनोव्हा कार' क्रमांक ऐ पी 07 ऐ सी 4554 डिझेल भरण्यासाठी आली. कारमधील चालकाने पंपावरील कर्मचाऱ्याला २,००० रुपयांचे डिझेल भरण्यास सांगितले. डिझेल भरल्यानंतर जेव्हा कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली, तेव्हा कारमधील एका इसमाने त्याला २ हजार रुपये दिले.
या पैशांपैकी १,००० रुपयांची नोटबंदी मधील खरी नोट होती. , मात्र ५०० रुपयांच्या इतर दोन नोटांवर 'भारतीय बच्चो का बँक - चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' असे लिहिलेले होते. हा प्रकार पंपावरील सतर्क कर्मचाऱ्याच्या तात्काळ लक्षात आला नोटा नकली असल्याचे समजताच कर्मचाऱ्याने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले आणि तात्काळ पंप मालक विकास गवळी यांना घटनेची कल्पना दिली. गवळी यांनी प्रसंगावधान राखत गाडी तिथेच रोखून धरली आणि मालेगाव पोलिसांशी संपर्क साधला.
माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पंप मालक व कर्मचाऱ्यांच्या समक्ष संशयित इनोव्हा कारची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान कारमध्ये पोलिसांना धक्कादायक घबाड सापडले. कारमध्ये 'चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया' लिहिलेल्या ५०० रुपयांच्या तब्बल ४,७०० नकली नोटा आढळून आल्या, ज्यांची एकूण किंमत २३,५०,०००/- रुपये (२३ लाख ५० हजार) आहे. या कारवाईत २३.५० लाख रुपयांच्या नकली नोटा आणि इनोव्हा कार (AP 07 AC 4554)जप्त करण्यात आले.
कारमधील सर्व ७ जणांवर अप क्र. ३७५/२०२६, कलम १७९, ३(५) भान्यासं (भारतीय न्याय संहिता) मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी माधव केशव काटेकर (वय ६१ वर्ष, रा. मालेगांव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी ७ ही आरोपींना अटक केली असून, या रॅकेटचे धागेदोरे कुठे पसरले आहेत याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार करत आहेत.
सदरची धडक कारवाई माननीय पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदिप अग्रवाल साहेब, पोलीस निरीक्षक राजेश खेर्डे , पोउपनि राजेश यलगुलवार, पोलीस हवालदार मनिष राठोड, शिवाजी काळे, जयशंकर पाटील, नाईक पोलीस कॉन्स्टेबल विजेंद्र ईंगोले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, वैभव इरतकर आणि गणेश मेटांगळे यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे पेट्रोल पंप चालक आणि व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.