डोंबिवली : चारित्र्याच्या संशयातून राहत्या घरातच पतीने पत्नीचा चाकुने गळा चिरून हत्या केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कल्याण तालुक्याच्या मुरबाड रोडला असलेल्या वरप गावातील हायप्रोफाई सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वजीत प्रिअर्स सोसायटीत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीची केल्यानंतर पतीने त्याच चाकुन स्वतावर वर करत आत्महत्याचा प्रयत्न केला, मात्र तो सफल ठरला आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
विद्या संतोष पोहळ (४०) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर संतोष पोहळ (४१) असे पत्नीला ठार मारून चाकूने वार करत स्वतःला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या जखमी पतीचे नाव आहे. पतीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिली.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पोहळ हे मृत पत्नी आणि दोन मुलांसह कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात असलेल्या विश्वजीत प्रिअर्स या आलिशान सोसायटीत राहतो. हल्लेखोर संतोष हा ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी विद्या ही टाटा मोटर्समध्ये नोकरी करत होती. काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून विद्या आणि संतोष यांच्यामध्ये सतत वाद सुरू होते. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या वादाने परिसीमा गाठली. संतापाच्या भरात संतोषने पत्नी विद्यावर धारदार चाकूने सपासप वार करून तिचा गळा देखिल चिरला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात तडफडत ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर भानावर आलेल्या संतोषने त्याच चाकूने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती कळताच म्हारळ चौकीचे अधिकारी दत्तात्रय नलावडे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयाकडे पाठवून दिला. तर जखमी अवस्थेत पडलेल्या संतोषला उचलून उल्हासनगर येथील मध्यवर्ती रूग्णालयाकडे हलविण्यात आले. प्राथमिक तपासात वैवाहिक वाद आणि चारित्र्यावर घेतलेल्या संशयातून हा सारा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. संतोषची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या धक्कादायक घटनेमुळे कल्याण तालुक्यात खळबळ माजली आहे. शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या विश्वजीत प्रिअर्ससारख्या प्रतिष्ठित सोसायटीत घडलेल्या या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. या गंभीर घटनेचा अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिली.