Crime News pudhari photo
ठाणे

Car driver killed|कार चालकाची निघृण हत्या, कल्याण-वडवलीत क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकले

Car driver killed- महिलेसह तिघांची धरपकड, खडकपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याणजवळील वडवली परिसरामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने रक्तरंजित हत्याकांडाचे रूप घेतले असून कारचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून कार चालकाची चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण अ प्रभाग परिसरात भीतीचे वातावरण आहे. राज मढवी असे हल्ल्यात ठार झालेल्या कार चालकाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा थरार शनिवारी रात्रीच्या सुमारास कल्याण-वडवली परिसरात घडला. राज मढवी हे त्यांच्या कारने जात असताना कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या अप्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात त्याच्या कारचा हलकासा धक्का स्कूटरला लागला. या किरकोळ धक्क्यावरून तिथे उपस्थित असलेले विकास आणि सौरभ या दोघांशी राज याचा वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र थोड्यावेळाने वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात विकास आणि सौरभयांनी राजवर हल्ला केला.

यातील एकाने कमरेला खोचलेला चाकू काढून राजच्या सर्वांगावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजचा जागीच मृत्यू झाला. या हत्याकांडात एका महिलेची भूमिकाही समोर आली आहे. खडकपाडा पोलिसांनी विकास सौरभ आणि संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

किरकोळ कारणावरून वाद विकोपाला...

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार दुचाकीला धक्का लागल्याने तिचे काही भाग खराब झाले. त्यामुळे मारेकरी नुकसान भरपाईची मागणी करत होते. या कारणावरून वाद वाढत विकोपाला गेला आणि तिघांनी मिळून कारचालक राज मढवी याच्यावर चाकूने वार केले. वार जिव्हारी बसल्यामुळे राज घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात तडफडत जागीच ठार झाला. मारेकरी नशेत होते का? किंवा या हत्येमागे आणखी कोणते कारण आहे का? याचाही पोलीस कसून तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT