नेवाळी: कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला असून, सोमवारी सायंकाळी झालेल्या प्रचंड कोंडीनंतर मंगळवारी सकाळीही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून कल्याण- शिळ मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहनांच्या रांगांमुळे कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी घराबाहेर पडलेल्या हजारो नोकरदार, कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना पुन्हा एकदा तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दै. 'पुढारी'नेही या समस्येवर वारंवार प्रकाश टाकत वाहतूक पोलिसांचे सातत्यपूर्ण पेट्रोलिंग, वाहतूक नियोजन व बस सेवा वाढविण्याची गरज अधोरेखित केली होती.
मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काटई नाका, मानपाडा चौक, कल्याणफाटा, डायघर, पडले आणि शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट तयार झाले आहेत.
एका ठिकाणी वाहतूक मंदावली की त्याचा परिणाम संपूर्ण मार्गावर होत आहे. त्यात काही वाहनचालक चुकीच्या मार्गिकेतून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने कोंडी आणखी वाढत आहे. परिणामी नियम पाळणाऱ्या वाहनचालकांनाही त्याचा फटका बसत आहे.वाहतूक कोंडीनंतरच पोलिसांची हालचाल सुरू होत असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे.
कोंडीच्या हॉटस्पॉटवर कायमस्वरूपी पेट्रोलिंग व्हॅन तैनात करून वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवणे, चुकीच्या मार्गिकेतून जाणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि सिग्नल समन्वयासह वाहतुकीचे नियोजन करणे, या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सरकारी बससेवा अपुरी असल्याने खासगी वाहनांचा वापर वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण अधिक वाढत आहे. कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासन, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.