Kalyan Railway Station Misbehavior pudhari
ठाणे

Kalyan Railway Station Misbehavior: कल्याण रेल्वे स्थानकातील उपप्रबंधकाकडून महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन; मनसे स्टाईल दणका

कारवाई न झाल्याने मनसैनिकांनी दिला मनसे स्टाईल दणका

Anirudha Sankpal

Kalyan railway Station Misbehavior Case:

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याण रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले उपस्थानक प्रबंधक आशुतोष कुमार यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ माजली आहे. महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या रेल्वेच्या या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने संतप्त राजसैनिकांनी या वासनांध अधिकाऱ्याला मनसे स्टाईल दणका दिला.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, उपप्रबंधक आशुतोष कुमार हे संबंधित महिला कर्मचाऱ्याला सातत्याने अश्लील संदेश पाठवत होते आणि आपल्या घरी येण्यासाठी जबरदस्ती करत होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकाराला कंटाळून पिडीत महिला कर्मचाऱ्याने याबाबतची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र वरिष्ठांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

न्याय न मिळाल्याने अखेर पिडीत महिलेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. मनसेच्या रेल्वे युनिटचे पदाधिकारी प्रथमेश म्हात्रे यांच्याकडे ही तक्रार आल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. प्रथमेश म्हात्रे यांनी उपप्रबंधक आशुतोष कुमार यांना थेट महिला कर्मचाऱ्यासमोर बोलावून जाब विचारला. महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणे आणि घरी येण्याची जबरदस्ती करणे या बाबत विचारणा केली असता आशुतोष कुमार समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

त्यामुळे संतप्त झालेल्या राजसैनिकांनी आशुतोष कुमार यांना मनसे स्टाईलने चांगलाच धडा शिकवत जोरदार चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करत राजसैनिकांच्या तावडीतून आशुतोष कुमार यांची सुटका केली आणि त्यांना लोहमार्ग पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

त्यानंतर राजसैनिकांसह तक्रारदार महिला कर्मचारी देखील पोलिस ठाण्यात दाखल झाली. पिडीत महिलेच्या तक्रारीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी उपप्रबंधक आशुतोष कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT