

योगेश गोडे
सापाड: कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील १११ गुंठे वडिलोपार्जित शेतजमिनीच्या विकास करारातून २२ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे. जमीन मालकांना विकास करारानुसार सदनिका, दुकान गाळे व कार्यालयीन गाळे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र काही मालमत्ता परस्पर विकल्याचा, तर काही बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी विकासकाशी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरनुसार, गांधारीतील सर्व्हे क्रमांक ११/२, १२/२, १२/३, १३/१ आणि १४/१ मधील जमीन विजय सिताराम भंडारी व त्यांच्या कुटुंबाची आहे. २०११ मध्ये ही जमीन रॉईस डेव्हलपर्सशी संबंधित संजय शांताराम कानकोशे आणि राकेश क्रांतीभाई पटेल यांच्याकडे विकासासाठी देण्यात आली.
१२ ऑगस्ट २०११ रोजी विकास करार करण्यात आला. त्यानुसार जमीन मालकांना त्यांच्या हिश्श्याप्रमाणे मालमत्ता देण्याचे ठरले होते. या जागेवर २०१२ पासून बांधकाम सुरू होऊन सात इमारती आणि सुमारे ३९० सदनिका, दुकान व कार्यालयीन गाळे उभारण्यात आले. जमीन मालकांना अलॉटमेंट पत्रे देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात मालमत्ता न दिल्याचा आरोप आहे.
काही सदनिका परस्पर विकण्यात आल्या, तर काही बँकेकडे तारण ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. कर्जफेड न झाल्याने बँकेने संबंधित मालमत्तांवर नोटिसाही लावल्याचा आरोप आहे. तसेच १९ डिसेंबर २०२४ रोजी निधन झालेल्या सुदाम भंडारी यांच्या नावाने कागदपत्रांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पोलिसांनी विकास करार, विक्री व्यवहार, बँक कर्ज, अलॉटमेंट पत्रे, बांधकाम परवानग्या व इतर कागदपत्रांची तपासणी सुरू केली असून, प्रकल्पातील सदनिका-गाळे खरेदीदारांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.