मी इथला भाई...तू मला धक्का का मारला? बतावणी करून कल्याणमध्ये पादचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास file photo
ठाणे

Kalyan Chain Snatching | मी इथला भाई...तू मला धक्का का मारला? बतावणी करून कल्याणमध्ये पादचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास

कोळसेवाडी पोलिसांकडून कथित भाईचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : काय रे... तू मला धक्का का मारलास ? मी इथला भाई आहे...तुला माहिती नाही का ? अशी बतावणी करून कथित भाईने एका नोकरदार पादचाऱ्याला फैलावर घेतले. नंतर त्या इसमाने पादचाऱ्याच्या गळ्यात प्रेमाने हात घालून त्याच्या गळ्यातील सोन्याची ६३ हजार रूपयांची सोन्याची चेन अलगद काढून पोबारा केला. हा प्रकार गुरूवारी रात्रीच्या सुमारास कल्याण पूर्वेतील लोकग्राम भागातील गोदावरी इमारती समोर घडला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून कथित भाईचा शोध सुरू केला आहे.

कल्याण पूर्वेकडे तिसगाव परिसरातील जरीमरी मंदिराजवळ असलेल्या पुंडलिक हाईटस् सोसायटीत राहणारे शशिकांत गोपीनाथ डोंगरे (४०) यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन अनोळखी इसमाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शशिकांत शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शशिकांत डोंगरे हे कामावरून परतल्यावर कल्याण पूर्वेतील लोकग्राम भागातील गोदावरी इमारती समोरून मोबाईलवर बोलत पायी जात होते. इतक्यात समोरून आलेल्या एका अनोळखी इसमाने हेतुपुरस्सर धक्का दिला. पुढे गेल्यानंतर त्या इसमाने मला काय रे तुला दिसत नाही का ? तू मला धक्का का मारला ? मी इथला कोण आहे हे तूला माहित नाही का ? मी या भागातला भाई आहे, असे बोलून त्याने शशिकांत यांना फैलावर घेतले.

मी तुम्हाला धक्का मारला नाही. चुकून लागला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे बोलून शशिकांत डोंंगरे यांनी विषय संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो इसम ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. दिलगिरी व्यक्त करूनही तो इसम माझ्याजवळ आला. त्याने प्रेमाने गळ्यात हात टाकून काही कळण्याच्या आत त्याने शशिकांत यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची ६३ हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन अलगद काढून तेथून पळ काढला. पुढे गेल्यावर आपल्या गळ्यातील सोनसाखळी गायब असल्याचे शशिकांत यांच्या लक्षात आले. त्या इसमानेच चेन लांबविल्याची खात्री पटल्यानंतर शशिकांत यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास हवालदार विशाल वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

भामट्यांपासून सावध राहण्याच्या सूचना

चोर, लुटारू, बदमाश मंडळी चोऱ्या/चपाट्या करण्यासाठी वेगवेगळ्या विविध क्लृप्त्या लढवत आहेत. या माध्यमातून नागरिकांची लूट करत असल्याचे प्रकार वाढत आहेत. एखादा पादचारी पायी चालला असेल तर त्याला मुद्दाम धक्का द्यायचा आणि त्याला तू धक्का का मारला म्हणून दमदाटी करायची. पादचाऱ्याला घाबरून सोडायचे. नंतर त्या पादचाऱ्याकडून दादागिरी करून त्याच्याजवळील पैसे, मोबाईल, किंमती वस्तू, दागिने हाती लागले की पोबारा करायचा, असे प्रकार कल्याण-डोंबिवलीत वाढीस लागले आहेत. अशा भामट्यांपासून पादचाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT