

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात असलेल्या सत्यवान चौकातील एका सोसायटीत ७५ वर्षीय आजोबा आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर लघुशंकेसाठी जाण्याकरिता घरातील वॉशरूममध्ये जाण्याऐवजी झोपेच्या तंद्रीत त्यांनी घराचा मुख्य दरवाजा उघडला. घराबाहेर जाऊन वॉशरूम समजून घराच्या बाहेरील भागात लघुशंका केली. तेथून पुन्हा घरात जायचे समजून लिफ्टचा दरवाजा उघडला आणि तोल जाऊन त्याच लिफ्टच्या खोलवर असलेल्या डक्टमध्ये कोसळून आजोबा जागीच ठार झाले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बाबुराव सिताराम तावडे (७५) असे मृत्यू झालेल्या आजोबांचे नाव आहे. सत्यवान चौकातील साई बालाजी आर्केड सोसायटीत ते आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. बाबुराव यांना रक्ताभिसरणाचा त्रास होता. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. तरीही ते चालते फिरते होते. बाबुराव मध्यरात्रीच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी उठले. रात्रीची वेळ असल्याने कुटुंबीय झोपले होते. झोपेतून उठल्यामुळे बाबुराव यांना झोपेची गुंगी होती. त्या गुंगीतून ते घरातील वॉशरूममध्ये जाण्याऐवजी ते मुख्य दरवाजा उघडून घराच्या बाहेर गेले.
वॉशरूममध्ये असल्याचे वाटल्याने त्यांनी घराबाहेर लघुशंका केली. पुन्हा घरात जाण्याऐवजी थेट लिफ्टच्या दिशेने गेले. दरवाजा उघडला आणि झोपेच्या तंद्रीमुळे लक्षात न आल्याने ते लिफ्टच्या डक्टमध्ये कोसळले. मध्यरात्रीची वेळ असल्याने हा सारा प्रकार घरच्यांसह मजल्यावरील कुणालाच्या निदर्शनास आला नाही. सकाळी तावडे कुटुंबीय उठले. बाबा घरात आढळून आले नाही म्हणून सर्वत्र पाहिले, पण बाबा दिसले नाहीत.
लिफ्टच्या डक्टमध्ये पाहिले असता त्यात बाबा निपचित पडलेले आढळून आले. तावडे कुटुंबियांनी माहिती दिल्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर आजोबांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात पाठवून दिला. विष्णूनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.