Kalyan Murbad traffic pudhari photo
ठाणे

Kalyan Murbad traffic : कल्याण-मुरबाड महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

डी-मार्ट-जकातनाका अपघातांचा हॉटस्पॉट

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या म्हारळ परिसरातील धोकादायक रस्त्यांवर प्रशासन डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप करत या भागातील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. म्हारळची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना रस्त्यावरून सुसाट वाहने धावत असल्यामुळे डी-मार्ट ते जकात नाका अपघातांचा हॉटस्पॉट झाला आहे. परिणामी या भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

विशेषतः म्हारळ-उल्हासनगर डी-मार्ट परिसर, म्हारळ जकात नाका, जुनी पोलिस चौकी आणि म्हारळ सोसायटी परिसर या ठिकाणी गतिरोधक नसल्याने नागरिक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी यापूर्वी अनेक भीषण अपघात झाले असून अपघातांचा हॉटस्पॉट म्हणून हा रस्ता ओळखला जाऊ लागला आहे.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ निकेत व्यवहारे आणि अशफाक शेख यांनी प्रशासनाला निवेदन देत संताप व्यक्त केला आहे. या निवेदनात त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे सर्वेक्षण करून तातडीने गतिरोधक बसवणे, रोड मार्किंग करणे, स्ट्रीट लाईट सुरू करणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

कल्याण-मुरबाड हा राज्यमार्ग सध्‍या अपघातग्रस्त मार्ग झाला असून मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तसेच मोठ्या प्रमाणात असलेली वळणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. कल्याण - मुरबाड- अहिल्यानगर असा हा राज्य मार्ग आहे. दोन जिल्हे जोडणारा मार्ग असूनही त्याची आवश्‍यक ती डागडुजी केली जात नाही. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करा, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी आवश्‍यक निधी मिळावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

तर १ सप्टेंबरपासून चवदार तळे येथे अन्नत्याग आंदोलन

जर ३१ ऑगस्टपर्यंत प्रशासनाने यावर कार्यवाही केली नाही तर १ सप्टेंबरपासून डी-मार्ट जवळील चवदार तळे येथे अन्नत्याग आंदोलन करण्याचा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. म्हारळ ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन आता तरी जागे होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT