

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. बसेस सतत नादुरूस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून त्याचा थेट फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास डोंबिवलीतील बाजीप्रभू चौक स्थानकातून निवासी विभागाकडे निघालेली केडीएमटीची बस मिलापनगर स्टॉपवर आल्यानंतर अचानक नादुरुस्त होऊन बंद पडली. बसमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून प्रवाशांना तिथेच उतरविले.
बस अचानक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि त्यांना पुढील प्रवासासाठी दुसरा पर्याय शोधावा लागला. मुळातच निवासी मार्गावर केडीएमटीच्या बस वेळापत्रकानुसार धावत नाहीत. कारण व्यवस्थापनाकडे बसेसचा मोठा तुटवडा आहे. त्यात अशा बस नादुरूस्त झाल्याने निवासी ते डोंबिवली या मार्गावरील फेऱ्यांची संख्या आणखी कमी झाली आणि प्रवाशांना बस थांब्यावर अधिक काळ ताटकळत उभे रहावे लागले.
जवळपास दीड तासानंतर केडीएमटीचा मेकॅनिक घटनास्थळी आल्यानंतर तात्पुरती दुरूस्ती करून ही बस तेथून हलवण्यात आली. नादुरुस्त झालेल्या बसला रस्त्यातच उभे करून ठेवल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्याचा फटका पादचारी आणि इतर वाहनचालकांना बसला. त्यातच शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली होती. केडीएमटीच्या या सुमार दर्जाच्या बसेसमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून याचा फायदा रिक्षाचालक घेत असल्याचे दिसत आहे.