कल्याणात छेड काढल्याच्या संशयातून अल्पवयीन मुलांना मारहाण File Photo
ठाणे

Kalyan assault case : कल्याणात छेड काढल्याच्या संशयातून अल्पवयीन मुलांना मारहाण

कोळसेवाडी पोलिसांकडून छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अल्पवयीन मुलांसह त्यांना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कल्याण/डोंबिवली : दोन अल्पवयीन तरूण छेड काढत असल्याच्या संशयावरून कल्याणात गुरूवारी दोन गट आमने/सामने आले. या दोन्ही गटांत जोरदार राडा झाला. राडा स़ोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एकाचा बीपी वाढल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. ज्या अल्पवयीन मुलांवर छेडछाडीचा आरोप करण्यात आला त्यांच्यावर आधी गाडीला कट मारल्याचा आरोप केला गेला.

आत्ता या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अल्पवयीन मुलांसह त्यांना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्यामुळे कल्याण पूर्वेतील शंभर फूटी रस्त्यावर दीड तास वाहतूक कोंडी झाली होती.

कल्याण पूर्वेतील शंभर फूटी रोडला एका महिला तिच्या नातेवाईकांसोबत दुचाकीवरून जात होती. इतक्यात पाठीमागून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांसोबत वाद झाला. आधी या दुचाकीस्वारांनी कट मारल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर काही वेळाने आपली या दोघांनी छेड काढल्याचा आरोप केला. या महिलेने तिच्या साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले.

याच दरम्यान अल्पवयीन तरूणांनी देखिल त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. घटनास्थळी दोन्ही गट आमने-सामने आले. शाब्दिक बाचाबाचीनंतर दोन गटांत जोरदार राडा झाला. या राड्यामुळे कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राडा सोडविण्याचा प्रयत्न केला.

राडेबाजांच्या विरोधात कारवाई काय? -बघ्यांचा सवाल

वास्तविक पाहता त्या दोन तरूणांनी काही गंभीर अपराध केला असल्यास त्यांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे. परंतु साथीदारांना बोलावून भर रस्त्यात राडा करणे, पोलिसांसह त्या तरूणांना मारहाण करणे आणि लोकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे ? असा सवाल उपस्थित करण्यात आला असून राडेबाजांच्या विरोधात पोलिस ठोस कारवाई करणार का? असा प्रश्न घटनास्थळी थांबलेल्या कल्याणकर बघ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT