

मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील ऐतिहासिक भेटीची चर्चा जगभरात होत असतानाच मुंबईतील ‘लोकभवन’मध्ये या दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या अस्सल मराठी स्वादाची गोष्ट आता समोर आली आहे. भारत-फ्रान्स संबंधांना नवी उंची देणाऱ्या या दौऱ्यात परदेशी पाहुण्यांच्या जिभेवर महाराष्ट्राच्या मातीतील चव रेंगाळली. यामध्ये कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीची बर्फी, डोमगावचा हुर्डा आणि डहाणूचे चिकू यांचाही समावेश होता.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह संपूर्ण शिष्टमंडळासाठी लोकभवनाने वडापाव आणि झणझणीत मिसळपावचा बेत आखला होता. विशेष म्हणजे मुंबईच्या या ‘ग्लोबल’ वडापावने फ्रान्सच्या शिष्टमंडळालाही अक्षरशः वेड लावले. त्यांनी या मराठमोळ्या पदार्थांचे आवर्जून कौतुक केले.
बर्फीत कृत्रिम रंग नाही
गोड पदार्थांमध्येे कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीची प्रसिद्ध बर्फी ठेवण्यात आली होती. कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर न करता तयार झालेली ही पारंपरिक बर्फी ठेवण्यात आली होती. देशी-विदेशी पाहुण्यांनी त्याचा आस्वाद घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील ‘मिलेटस् मिशन’ला केंद्रस्थानी ठेवून न्याहारीसाठी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील डोमगावचा नैसर्गिक ज्वारीचा हुरडा खास मागवण्यात आला होता.
या गावरान चवीसोबतच पालघर जिल्ह्याचा अभिमान असलेले डहाणूचे रसाळ चिकू आणि नैसर्गिक जॅमने डिझर्टची रंगत वाढवली. महाराष्ट्रातील इतर पदार्थांच्या अस्सल तडक्याने पंतप्रधानांसह त्यांच्या शिष्टमंडळाला तृप्त केले.