

मुंबई ः महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाच्या किमान चार नेत्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिसत असल्याने या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्या इच्छुकांना संधी दिली गेली नव्हती, त्यांना राज्यसभेसाठी शब्द देण्यात आला होता. ही मंडळी आता नेत्यांच्या भेटीगाठी घेऊ लागली आहेत. भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे आमदारांची संख्या मोठी आहे. किमान चार नेते राज्यसभेवर नेमले जाऊ शकतील, अशी अभूतपूर्व अनुकूल स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
विजया रहाटकर यांना अपेक्षा
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना संधी दिली जाईल, असे मानले जाते. भारतीय जनता पक्षात ‘एक व्यक्ती एक पद’ हा निकष अमलात आणला जात असल्यामुळे त्या राज्यसभेवर निवडून आल्या तर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद त्यांना सोडावे लागेल. भाजप याबाबत काय निर्णय घेतो याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. संभाजीनगरच्या महिला महापौर राहिलेल्या रहाटकर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. महापौर असताना या दोघांनीही आपापली शहरे संभाजीनगर आणि नागपूरसाठी केलेले एकत्र काम लक्षात घेता त्यांना ही संधी मिळेल असेही अंदाज बांधले जात आहेत.
डॉ. विनय सहस्रबुद्धे चर्चेत
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची धुरा गेली कित्येक वर्षे सांभाळणाऱ्या डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनाही यावेळी संधी दिली जाऊ शकते. सहस्रबुद्धे यांचे नीतीनिर्धारण धोरणात महत्त्वाचे स्थान असते. कार्यकर्ता प्रशिक्षणात त्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची आहे. प्रशिक्षणाला भाजपत कायमच महत्त्व आहे. राज्यात तसेच दिल्लीत असलेली त्यांची उठबस त्यांना संधी देण्याचे कारण ठरू शकते.
विश्वास पाठक यांच्याही नावाची चर्चा
प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विश्वास पाठक यांचेही नाव सध्या राज्यसभेसाठी चर्चेत आहे. मागच्या वेळीही त्यांना संधी होती. आता पाठक यांना संधी दिली जाते काय याबद्दलही चर्चा आहे.
तावडे यांना संधी देण्याची मागणी
भाजपच्या राष्ट्रीय घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विनोद तावडे यांना राज्यसभेवर संधी मिळणे ही त्यांच्या कामाला दिलेली पावती ठरणार आहे. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपच्या राजकारणात आलेल्या तावडे यांना आता पक्षाने संधी द्यावी, असे मानणारा मोठा वर्ग आहे.
डॉ. कराड यांना संधी मिळणार का?
डॉक्टर भागवत कराड हे वंजारी समाजातील नेते असून त्यांनाही पुन्हा एकदा संधी मिळेल काय याबद्दल चर्चा आहे. पहिल्याच राज्यसभेच्या कारकिर्दीत त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीही नेमण्यात आले होते.
भारतीय जनता पक्षाची बाजू सातत्याने माध्यमात मांडणाऱ्या माधव भंडारी यांना परिषद किंवा राज्यसभा काहीही मिळाले नाही. त्यांनी आता या संबंधात कोणीही काही बोलू नका अशी विनंती सुरू केली आहे. मात्र त्यांचा मुलगा चिन्मय याने काही दिवसांपूर्वी मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेत संधी मिळाल्यानंतर माझ्या वडिलांचे काय चुकले, असा एक भावनात्मक ब्लॉग लिहिला होता.
उमेदवारांची नावे ऐनवेळी जाहीर होणार
भारतीय जनता पक्षाच्या सत्ता समीकरणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या काही जाती प्रवर्गांनाही राज्यसभेवर संधी देण्याची पक्षाची भूमिका असते. यातील काही नावेही अचानकपणे समोर येऊ शकतात. भाजपची आजवरची पद्धत पाहता राज्यसभेवर कोणाला पाठवायचे ती नावे ऐनवेळी आदल्या दिवशी अंतिम होतील. मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात कोणाला संधी दिली जाईल याकडेही लक्ष लागले आहे.
प्रत्येकी पाच खासदार राज्यसभेवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची योग्य प्रकारे हातमिळवणी केली तर त्यांच्या मतांची बेरीज लक्षात घेता कदाचित भाजप आणि शिंदे सेना यांचे पाच खासदार राज्यसभेवर नेमले जाऊ शकतात. पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे वर्षानुवर्षे भारतीय जनता पक्षाचे काम करणाऱ्या नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. निवडणुकीच्या काळात भाजपसाठी व्यूहरचना करणाऱ्या पडद्यामागच्या नेत्यांबरोबरच ज्यांना आजवर संधी मिळाली नाही, अशाही लोकांची नावे चर्चेत आहेत.