डोंबिवली : आतापर्यंत आमचे पाणी कुणीही तोडू शकणार नाही? अशा आविर्भावात वावरणाऱ्या पाणी चोरांना एमआयडीसी प्रशासनाने चांगलाच धडा शिकवला आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनींवरून चोरून घेण्यात आलेल्या बेकायदा नळ जोडण्या तोडण्याची डोंबिवली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मोहीम उघडली आहे.
बुधवारी दिवसभरात कल्याण पूर्वेतील मलंगगड रोडला असलेल्या नांदिवली परिसरातील एकूण 38 अनधिकृत नळ जोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात आली. एमआयडीसीच्या आक्रमक पावित्र्यामुळे पाणी चोरांची दहशत संपुष्टात आली आहे.
एमआयडीसीच्या बारवी धरणाकडून येणाऱ्या कल्याण फिडर जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी, गॅरेज मालकांसह काही आस्थापनांनी बेकायदा नळ जोडण्या घेऊन पाणी चोरी करत असल्याचे एमआयडीसी डोंबिवली विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. या अधिकाऱ्यांनी गनिमी काव्याचा वापर करून मलंग रोड परिसरातील एमआयडीसीच्या जलवाहिनीला छिद्रे पाडून घेतलेल्या नळ जोडण्यांचा सर्व्हे केला.
गायत्री शाळा परिसर, तसेच नांदिवलीतर्फे या परिसरातील काही स्थानिक रहिवासी, गॅरेजवाले, दुकानदार यांनी चोरीच्या नळ जोडण्यात घेतल्या असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. काही नळ जोडण्या मुख्य जलवाहिनीला वेल्डिंग यंत्राच्या साह्याने छिद्रे पाडून त्यामध्ये वाहिका टाकून त्या वाहिकेला जलवाहिनीला वेल्डिंगच्या साह्याने बंदिस्त करून चोवीस तास पाणी पुरवठा घेतला जात होता. हे चोरीचे पाणी असल्याने या माध्यमातून एमआयडीसीचा पाणी शुल्काचा महसूल बुडविला जात होता.
अशाप्रकारे चोरटे एमआयडीसीचे पाणी चोरी करून महसूल बुडवित असल्याने अधिकाऱ्यांनी कारवाईचा निर्णय घेतला. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशांनुसार डोंबिवली एमआयडीसीच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता औदुंबर अलाट यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, सुरक्षेसाठी विशेष कमांडो पथक बुधवारी सकाळी कल्याण-मलंगगड रोडला जेसीबीसह तोडकाम पथक घेऊन गेले.
काटई-बदलापूर मार्गावरही लवकरच कारवाई
कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडिवली/ढोकळी परिसर बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखले जाते. या भागाला केडीएमसीच्या जलवाहिन्यांवरून स्थानिकांनी चोरून पाणी घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एमआयडीसीने बेकायदा नळ जोडण्या तोडण्याची मोहीम सुरू केल्याने पाणी चोरांमध्ये खळबळ माजली आहे. काटई-बदलापूर मार्गावर असलेल्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला छिद्रे पाडून त्यातून पाणी चोरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बेकायदा ढाबे, हॉटेल्स आणि वॉशिंग सेंटर्सला लागणाऱ्या पाण्याच्या चोरांवर देखिल लवकरच मोठी कारवाई होणार आहे. या वृत्ताने परिसरातील पाणी चोरांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता
या पथकाने एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरून चोरीच्या नळ जोडण्या वेल्डिंग यंत्र, काही नळजोडण्या जेसीबीच्या सहायाने तोडून टाकल्या. कारवाई दरम्यान विशेष कमांडो पथक असल्याने कुणीही रहिवासी, आस्थापनांच्या मालकांनी कारवाईला विरोध करण्याचे धाडस केले नाही. प्लास्टिकचे 20 ते 30 फुटाचे पाईप जलवाहिनीला जोडून त्या माध्यमातून ही पाणी चोरी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या वाहिका जेसीबीच्या सहायाने तोडून टाकण्यात आल्या. या सर्व वाहिका जप्त करून एमआयडीसीच्या भंगार साहित्य तळावर नेण्यात आल्या. कारवाईमुळे यापुढे फुकटचे पाणी मिळणार नसल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.