

नवी मुंबई : एपीएमसीत घाऊक भाजीपाला बाजारात बुधवारी सचिवांच्या निर्देशानुसार सी आणि डी विंगमधील मोकळ्या जागेत बेकायदा किरकोळ व्यापार करणाऱ्या सुमारे 350 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
एपीएमसीत घाऊक भाजीपाला बाजारात सर्वच विंगमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बाजार मांडून मोकळ्या जागेत किरकोळ व्यापार केला जातो. घाऊक व्यापारीकडून माल खरेदी करून तो त्याच जागी बसून अनधिकृत व्यापार केला जातो. एका विंगमध्ये सुमारे 350 गाळे आहेत. या जागा काबीज करून त्या ठिकाणी अनधिकृत व्यापार करणाऱ्यांवरुन अनेकदा वादविवाद झाले.
काही गाळेमालकाला हा विक्रेता जागेचे भाडे देतो. मात्र त्या जागेचा कुठलाही मालकी हक्क नसताना ही जागा अनधिकृत विक्रेत्यांना व्यापारासाठी दिली जाते. याबाबत सचिव शरद जरे यांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश भाजीपाला बाजार उपसचिवांना दिले होते.